गडचिरोली : शेतातील सौर झटका मशीनचा शॉक, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

145

गडचिरोली : शेतातील सौर झटका मशीनचा शॉक, दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
– लहान भावाचा मृतदेह पाहण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावाचाही विजेचा धक्का लागून मृत्यू
The गडविश्व
देसाईगंज, दि. १० : वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतात लावलेल्या सौर झटका मशीनचा विद्युत धक्का लागून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देसाईगंज तालुक्यातील चिखली येथे घडली. शेतात गेलेला लहान भाऊ मृतावस्थेत आढळल्यानंतर त्याला पाहण्यासाठी गेलेल्या मोठ्या भावाचाही विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
अरविंद धर्माजी बुद्धे (५०) आणि अशोक धर्माजी बुद्धे (५८), अशी मृत भावांची नावे आहेत. दोघेही चिखली येथील रहिवासी होते. हे गाव देसाईगंज तालुका मुख्यालयापासून सुमारे १२ किलोमीटर अंतरावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद बुद्धे हे ९ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९ वाजता कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी जंगलालगत असलेल्या आपल्या शेतात गेले होते. मात्र, दुपारपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांचे मोठे बंधू अशोक बुद्धे हे त्यांना शोधण्यासाठी शेतात गेले.
शेतात पोहोचल्यावर त्यांना अरविंद हे सौर झटका मशीनच्या तारेच्या कुंपणाजवळ मृतावस्थेत आढळले. लहान भावाला स्पर्श करताना अशोक यांनाही विजेचा धक्का बसला आणि त्यांचाही मृत्यू झाला. बराच वेळ होऊनही दोन्ही भाऊ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शेतात जाऊन पाहिले असता दोघांचेही मृतदेह आढळले. एकाच कुटुंबातील दोन भावांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गणपती विसर्जनाच्या दिवशी गावावर शोककळा

घटनेच्या दिवशी गावात मस्कऱ्या गणपतीच्या विसर्जनाची लगबग सुरू होती. मात्र, दोन सख्ख्या भावांच्या मृत्यूची बातमी समजताच गावातील उत्साहावर विरजण पडले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देसाईगंज येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #Desaiganj #Chikhali #SolarFence #ElectricShock #TwoBrothersDead #TragicIncident #FarmSafety #AgricultureNews #MaharashtraNews #GadchiroliNews #TheGadvishva

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here