गडचिरोलीतून बाहेर चारा नेण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
– दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय; हिरवा चारा, कडबा, कुट्टी, पेंढा, टीएमआरसह पशुखाद्याच्या वाहतुकीवर निर्बंध
The गडविश्व
गडचिरोली, दि.०८ : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यातून इतर जिल्ह्यांत तसेच राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओल्या चाऱ्याची वाहतूक आणि विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
सन २०२६ च्या खरीप हंगामात ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये गडचिरोली व चामोर्शी या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा बाहेर पाठविल्यास भविष्यात जिल्ह्यातच चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुधनासाठी पुरेसा चारा उपलब्ध राहावा, यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
आदेशानुसार, जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून इतर जिल्ह्यांत किंवा राज्याबाहेर हिरवा चारा, कडबा, कुट्टी, पेंढा, टीएमआर तसेच इतर पशुखाद्याची वाहतूक व विक्री करता येणार नाही. ही बंदी सुक्या आणि ओल्या अशा दोन्ही प्रकारच्या चाऱ्याला लागू राहणार आहे.
दरम्यान, शासकीय योजनांतर्गत होणारी चारा वाहतूक तसेच पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाची अधिकृत मंजुरी असलेली वाहतूक या आदेशातून वगळण्यात आली आहे.
चारा टंचाईमुळे भविष्यात पशुधनाच्या जीवितास धोका निर्माण होण्यासोबतच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश लागू करण्यात आला आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २२३ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #GadchiroliNews #Drought #FodderShortage #Maharashtra #GadchiroliDistrict #FodderBan #Farmers #Livestock #DistrictCollector













