अंगारा बचतगटांच्या महिलांचा पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा; आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनी खळबळ
– खात्यांमधून संशयास्पद व्यवहार झाल्याचा महिलांचा आरोप
The गडविश्व
कुरखेडा, दि. ०७ : अंगारा परिसरातील बचतगटांच्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी शेकडो महिलांनी आजाद समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली मालेवाडा पोलिस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.
मोर्चादरम्यान महिलांनी त्यांच्या बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार, बचतगटांच्या पैशांचा कथित गैरव्यवहार आणि कर्जाच्या नोंदींबाबत गंभीर तक्रारी पोलिसांसमोर मांडल्या.
अंगारा परिसरातील सुमारे २५ बचतगट आणि शेकडो महिलांच्या खात्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तत्कालीन विदर्भ कोकण ग्रामीण बँक आणि सध्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेअंतर्गत कार्यरत असलेल्या बीसी केंद्रामार्फत व्यवहार करताना महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
महिलांच्या म्हणण्यानुसार, एकाच व्यवहारासाठी वारंवार अंगठा घेणे, खात्यातून अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम काढणे, बचतगटांच्या खात्यातील रक्कम इतरत्र वळविणे तसेच कर्जाची परतफेड केल्यानंतरही पुन्हा कर्ज दाखविणे, अशा बाबी निदर्शनास आल्या आहेत.
पोलिसांचे आश्वासन; चौकशीकडे महिलांचे लक्ष
महिलांनी मालेवाडा पोलिस ठाण्यात आपली व्यथा मांडल्यानंतर प्रभारी पोलिस निरीक्षक चैतन्य काटकर यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणण्याचे आश्वासन दिले. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
गरीब व अशिक्षित महिलांच्या कष्टाच्या पैशांचा प्रश्न असल्याने प्रत्येक महिलेच्या खात्याची आणि संबंधित बचतगटांच्या आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करावी, अशी मागणी आजाद समाज पार्टीने केली.
‘दोषी कोणताही असो, कारवाई झाली पाहिजे’
आजाद समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी प्रशासनाने प्रत्येक महिलेच्या खात्याची तपासणी करावी, अशी मागणी केली. जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दोषी कोणताही असो, चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली.
दरम्यान, चौकशीत दिरंगाई झाल्यास पुढील आंदोलनाचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलिस तपासात या आर्थिक व्यवहारांचे नेमके वास्तव काय समोर येते, याकडे अंगारा परिसरातील शेकडो महिलांचे लक्ष लागले आहे. मोर्चात विनोद मडावी, राज बन्सोड, चेतन काटेंगे, तुषार रामटेके, अंकुश कोकोडे, नागसेन खोब्रागडे, विवेक खोब्रागडे, सतीश दुर्गमवार, सावन चिकराम, पितांबर हर्रो, मंगेश बन्सोड, प्रफुल रायपुरे यांच्यासह आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी, बचतगटांच्या प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchrolipolice #Gadchiroli #Kurkheda #MaleWada #Angara #SelfHelpGroup #WomenProtest #SavingsGroup #FinancialFraud #GadchiroliNews #TheGadvishva













