गडचिरोली : जखमांच्या निरीक्षणातून वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा, आरोपी अटकेत
– तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : चामोर्शी तालुक्यातील नारायणपूर येथील ६० वर्षीय वृद्ध महिलेच्या खुनाचा छडा लावण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी संदीप रावजी टेकाम (३५, रा. नारायणपूर चक क्र. २) याला २९ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली.
५ सप्टेंबर रोजी गोपीकाबाई रामचंद्र गायकवाड या शेतात गेल्या होत्या. सायंकाळपर्यंत त्या घरी परतल्या नसल्याने नातेवाईकांनी शेत परिसरात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी चामोर्शी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी मृतदेहावरील जखमांचे बारकाईने निरीक्षण केले. जखमांच्या स्वरूपावरून आरोपी डावखुरा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या दिशेने तपास करताना पोलिसांनी तांत्रिक पुरावे, कौटुंबिक संबंध आणि गोपनीय माहितीच्या आधारे संदीप टेकाम याला ताब्यात घेतले.
चौकशीत जुन्या वादातून काठीने मारहाण करून त्यानंतर दगडाने ठेचून खून केल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोमकें घोटच्या पथकाने केली. गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी तपास पथकाचे कौतुक केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews













