शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा

38

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करा
– आजाद समाज पक्षाच्या कार्यकर्ता संमेलनात ठराव; गावागावांत ‘प्रतिसरपंच’ उपक्रम, आरोग्य-शिक्षणासाठी हेल्पलाईनची घोषणा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : पदवीधर मतदारसंघाच्या धर्तीवर नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र ‘शेतकरी मतदारसंघ’ निर्माण करून शेतकऱ्यांना आपला स्वतंत्र लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार द्यावा, अशी मागणी आजाद समाज पक्षाच्या गडचिरोली जिल्हा कार्यकर्ता संमेलनात करण्यात आली. यासंदर्भातील ठराव संमेलनात मंजूर करण्यात आला. हा ठराव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई चंद्रशेखर आजाद यांच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचविण्याचा निर्णयही घेण्यात आला.
कात्रटवार सभागृह, चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित या संमेलनात पक्षाची आगामी संघटनात्मक बांधणी, ग्रामपातळीवरील प्रश्नांवर आंदोलन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी यावर चर्चा झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश सचिव दिगंबर पलटणकर होते. महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव संदीपदादा मोरे व विदर्भ सचिव धर्मानंद मेश्राम यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

‘प्रतिसरपंच’ उपक्रमाला सुरुवात

ग्रामपातळीवरील नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामविकासातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराविरोधात जनतेचा सजग प्रतिनिधी म्हणून ‘प्रतिसरपंच’ उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राज बन्सोड व जिल्हा प्रभारी विनोद मडावी यांनी दिली. पहिल्या टप्प्यात तब्बल ३५ ग्रामपंचायतींसाठी प्रतिसरपंचांची नियुक्ती करण्यात आली.

आरोग्य-शिक्षणाच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन

जिल्ह्यातील आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाच्या वतीने स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. हेल्पलाईन क्रमांक लवकरच जाहीर केला जाणार आहे. शासकीय रुग्णालयांतील अडचणी, उपचारातील त्रुटी, शाळा-शिक्षकांशी संबंधित प्रश्न तसेच विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी या माध्यमाचा उपयोग केला जाणार आहे.

संघटन विस्ताराला वेग

संमेलनात विविध पदांवर नवीन नियुक्त्याही करण्यात आल्या. सतीश कुसराम यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी, तर तुषार रामटेके यांची जिल्हा प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय मारोती येलावार यांच्याकडे चामोर्शी तालुकाध्यक्षपद, रंजित बांबोळे यांच्याकडे धानोरा तालुका कार्याध्यक्षपद, उमेश तिम्मा यांच्याकडे एटापल्ली तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुका नियोजनबद्ध पद्धतीने लढण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गावागावांत संघटन मजबूत करण्यासोबतच तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारीत प्राधान्य देण्याचा मानसही जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पक्षाचे सहकारी प्रितेश अंबादे, नयना बन्सोड, शुभम पाटील यांची शिक्षक म्हणून, तर माजी जिल्हाध्यक्षा सोनाशी डांगे यांची आरोग्य विभागात शासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल त्यांचा शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here