AI, सोशल मीडिया अन् ऑनलाइन कमाईचे धडे; खामगावात उद्या मोफत डिजिटल कार्यशाळा

40

AI, सोशल मीडिया अन् ऑनलाइन कमाईचे धडे; खामगावात उद्या मोफत डिजिटल कार्यशाळा
– तरुण, महिला, विद्यार्थी व पत्रकारांसाठी देवनाथ गंडाटे यांचे मार्गदर्शन
The गडविश्व
खामगाव, दि.१९ : बदलत्या डिजिटल युगात करिअर आणि रोजगाराच्या नव्या संधींची माहिती देण्यासोबतच डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर कसा करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खामगाव येथे ‘डिजिटल वर्कशॉप’ चे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडिया, ऑनलाइन कमाई, ग्राफिक्स डिझाईन, व्हिडिओ मेकिंग, डिजिटल मार्केटिंग तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

युवा मंच, खामगाव तालुका यांच्या वतीने आयोजित ही मोफत कार्यशाळा रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत पत्रकार भवन, ग्रामीण पोलीस स्टेशनजवळ, खामगाव, जि. बुलडाणा येथे होणार आहे. नागपूर येथील वरिष्ठ पत्रकार तथा डिजिटल मीडिया अभ्यासक देवनाथ गंडाटे हे कार्यशाळेचे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आज Facebook, Instagram, YouTube आणि WhatsApp यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर व्यवसाय, पत्रकारिता, जनसंपर्क आणि वैयक्तिक ब्रँडिंगसाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या माध्यमांचा प्रभावी वापर करून डिजिटल क्षेत्रात स्वतःच्या कौशल्यांना रोजगाराच्या संधींमध्ये कसे रूपांतरित करता येईल, याची माहिती कार्यशाळेत प्रत्यक्ष उदाहरणांसह देण्यात येणार आहे.

घरबसल्या रोजगाराच्या संधींवर मार्गदर्शन

डिजिटल माध्यमांचा वापर केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न ठेवता त्यातून उत्पन्नाच्या संधी कशा निर्माण करता येतील, यावर कार्यशाळेत विशेष भर दिला जाणार आहे. सोशल मीडिया व्यवस्थापन, कंटेंट निर्मिती, ग्राफिक्स डिझाईन, व्हिडिओ मेकिंग, डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाइन सेवांच्या माध्यमातून घरबसल्या रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

AI च्या प्रभावी वापराचे धडे

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI मुळे पत्रकारिता, व्यवसाय, शिक्षण, कंटेंट निर्मिती आणि डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. AI चा योग्य आणि उत्पादक वापर करून वेळेची बचत, कंटेंट निर्मिती, माहितीचे नियोजन आणि डिजिटल कामकाज अधिक परिणामकारक कसे करता येईल, यावरही कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय Business WhatsApp Marketing, Facebook, Instagram, YouTube चा प्रभावी वापर, ऑनलाइन कमाईच्या संधी, ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ मेकिंग या विषयांवरही माहिती दिली जाणार आहे.

सहभागी होण्याचे आवाहन

ही कार्यशाळा विद्यार्थी, गृहिणी व महिला, तरुण व्यावसायिक, नवउद्योजक, डिजिटल माध्यमात करिअर करू इच्छिणारे युवक-युवती, पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणारे विद्यार्थी तसेच कार्यरत पत्रकारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कार्यशाळेचा प्रवेश निःशुल्क असून इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी ८५३०३७२१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here