गडचिरोली चामोर्शी मार्गावर बस पलटून भीषण अपघात : अनेकजण जखमी

113

गडचिरोली चामोर्शी मार्गावर बस पलटून भीषण अपघात : अनेकजण जखमी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : गडचिरोली–चामोर्शी मार्गावर शिवनी येथील नदीजवळ एसटी बस पलटून भीषण अपघात झाल्याची घटना आज, शुक्रवारी (दि. १८) दुपारच्या सुमारास घडली. बसचे अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

MH 06 8848 क्रमांकाची ही बस गडचिरोलीहून चामोर्शीकडे जात होती. बसमध्ये ५० हून अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती असून, यामध्ये चिमुकल्या मुलांचाही समावेश होता. शिवनी नदीजवळ अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि काही क्षणांतच बस पलटी झाली.

अपघात होताच बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली. दरम्यान, घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, जखमींची नेमकी संख्या, त्यांची प्रकृती तसेच संभाव्य जीवितहानीबाबत अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

धावत्या बसचे अचानक स्टेअरिंग लॉक होऊन चालकाचे नियंत्रण सुटणे ही गंभीर बाब मानली जात आहे. या घटनेमुळे एसटी बसगाड्यांच्या तांत्रिक स्थिती आणि देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

यापूर्वीही जिल्ह्यात बसचे चाक निखळल्याने अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसगाड्यांची नियमित तांत्रिक तपासणी, फिटनेस आणि वेळेवर देखभाल-दुरुस्ती केली जाते का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण, बसची तांत्रिक स्थिती आणि जखमी प्रवाशांची अधिकृत संख्या याबाबत संबंधित यंत्रणेकडून अधिक माहिती मिळणे बाकी आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here