स्त्रीच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा खरा मार्ग कोणता? प्रेम नव्हे, तर प्रेमयुक्त आदर!
मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन… आणि त्या लोकल ट्रेनमधलं लेडीज कंपार्टमेंट म्हणजे जणू एक स्वतंत्रच विश्व! गजबजलेलं, गोंगाटी आणि तरीही कुठेतरी विलक्षण आपुलकीने बांधलेलं.
फार कमी वेळा मी लोकलने प्रवास करते. पण जेव्हा कधी हा योग येतो, तेव्हा त्या डब्यातल्या स्त्रियांचं निरीक्षण करणं मला आपसूकच आवडतं. कारण या डब्यात काही मिनिटांत किंवा काही तासांत घडणाऱ्या गोष्टी कधी कधी एखाद्या जाडजूड ग्रंथापेक्षाही आयुष्याबद्दल अधिक काही शिकवून जातात.
मजेशीर बाब म्हणजे या साऱ्या जणी एकमेकींना बहुतांश वेळा फक्त चेहऱ्याने ओळखत असतात. नाव माहीत नसतं, घर माहीत नसतं, एकमेकींचं नेमकं वास्तव्य कुठे आहे हेही ठाऊक नसतं. तरीही त्यांच्यात एक अनोखं, शब्दांविनाच रुजलेलं आपलेपण असतं. जणू काही नात्याला नावाची गरजच नसते.
हळदीकुंकवापासून ते सण-उत्सवांपर्यंत सारं काही या लेडीज कंपार्टमेंटमध्ये साजरं होतं. कुणी घरचे लाडू आणलेले असतात, कुणी चकली, कुणी करंजी… आणि मग प्रेमाने आवाज येतो, “घे ना गं!” डबा फिरतो, पदार्थ संपतात; पण त्या आपलेपणाची चव मात्र मनात राहते.
एखादी नवी आई झाली असेल, तर तिचे डोहाळेही याच डब्यात पुरवले जातात. वय, शिक्षण, भाषा, जात, धर्म आणि आर्थिक परिस्थितीच्या सीमारेषा या छोट्याशा डब्यात कुठेतरी विरघळून जातात. कारण तिथे एकच ओळख महत्त्वाची उरते—”आपण सगळ्या स्त्रिया आहोत!”
या गप्पांचे विषयही तितकेच रंगतदार. कधी घरातल्या भाजीपासून सुरुवात होते, तर चर्चा मुलांच्या शाळेपर्यंत पोहोचते. कुणाच्या मुलाला परीक्षा असते, कुणाच्या मुलीचं लग्न ठरत असतं, कुणी नवीन साडी घेतलेली असते, तर कुणी नवऱ्याशी झालेल्या भांडणाची कहाणी सांगत असते.
सकाळी उठल्यापासून काय केलं, कोणाशी भांडण झालं, कुणी काय बोललं… सारं काही अगदी मोकळेपणाने सांगितलं जातं. जणू तो डबा एक अलिखित निवांत कोपरा असतो, जिथे काही काळासाठी मुखवटे उतरवून ठेवण्याची मुभा असते.
मनावर भावनिक ओझं असेल, घरात एखादी समस्या असेल, जवळच्या व्यक्तीचं आजारपण असेल किंवा आयुष्यातली एखादी न सुटणारी चिंता असेल, तरी या अनोळखी मैत्रिणी ते ओझं सहज हलकं करतात. त्या व्यक्तीला आपण पुन्हा कधी भेटणारही नाही, हे माहीत असतं; तरी तिच्याशी मन मोकळं केल्यानंतर मनाला एक वेगळीच उभारी मिळते.
मग त्यांच्यातली एखादी अनुभवी स्त्री शांतपणे सांगू लागते-परिस्थिती कशी हाताळायची, कुणाशी कसं बोलायचं, काय करायला हवं… जणू अनुभवाचं एक अदृश्य विद्यापीठच त्या डब्यात भरलेलं असतं.
कधी कधी आयुष्यभर ओळखणाऱ्या व्यक्तीपेक्षा एखादी अनोळखी व्यक्तीच आपल्याला दोन शब्द जास्त समजून घेते.
अशाच एका प्रवासात या सगळ्या गप्पा ऐकत असताना अचानक विषय निघाला—”पुरुषाच्या मनाचा रस्ता त्याच्या पोटातून जातो!”
उत्तम स्वयंपाक, नवऱ्याच्या आवडीचं जेवण, वेळेवर चहा… या सगळ्याचं महत्त्व सांगताना चर्चा रंगली होती. तेवढ्यात एकीने अचानक विचारलं,
“स्त्रियांच्या मनाचा रस्ता कुठून जातो? म्हणजे एका स्त्रीच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग कुठला?”
आणि एकच हशा पिकला.
कदाचित हा प्रश्नच सगळ्यांना अनपेक्षित वाटला असावा. जणू स्त्रीचं मन समजून घेण्याचा प्रयत्न करण्याची गरजच नसते, अशी शतकानुशतकांची एखादी मूक समजूत!
तेवढ्यात एकीने विचारलं, “हसण्यासारखं काय आहे यात? तिने चुकीचं काय विचारलं?”
दुसरी लगेच म्हणाली, “या प्रश्नाचा विचार जर कुणी आधीच केला असता ना, तर जग कुठल्या कुठे पोहोचलं असतं! आणि आपण आता विचार करायला लागलो तर ही लेडीज स्पेशल लोकलसुद्धा चुकायची!”
पुन्हा हशा.
तेवढ्यात आणखी एकीने मिश्कीलपणे म्हटलं, “कधीतरी चहाची वेळ चुकवून बघ… किंवा भाजीत मीठ घालायला विसरून बघ… मग बघ! सगळे रस्ते बरोबर सापडतील आणि त्यावर मोठमोठे उपदेशही मिळतील!”
सगळ्या पुन्हा खळखळून हसल्या.
मात्र त्यांचा हशा सुरू असताना माझ्या मनात एक वेगळाच विचार सुरू झाला होता.
खरंच… एखाद्या स्त्रीच्या हृदयाकडे जाणारा मार्ग कुठला?
छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशन केव्हा आलं, ते मला कळलंच नाही. बाकी सगळ्या जणी आपापल्या गप्पांमध्ये रमल्या होत्या; पण माझ्या मनात मात्र त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रवास सुरू झाला होता.
प्रेम?
नाही… फक्त प्रेम नाही.
प्रेम आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याला खूप आनंद देतं. पण नातं जसजसं पुढे जातं, तसतसं केवळ प्रेम पुरेसं राहत नाही. नातं टिकवण्यासाठी, जपण्यासाठी आणि त्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठी आणखी काहीतरी लागतं.
प्रेम हे बीज असतं; पण त्याला रोज पाणी घालणारं, ऊन-सावली सांभाळणारं तत्त्व वेगळं असतं.
मग काय?
आदर?
हो… पण नुसता आदरही पुरेसा नाही.
कारण एखाद्या व्यक्तीचा आदर आपण मनापासून करत असलो, तरी त्या आदरात मायेची ऊब नसेल, तर तो केवळ औपचारिकपणा ठरू शकतो.
आणि मग माझ्या मनाला एक उत्तर मिळालं—
“प्रेमयुक्त आदर!”
माझ्या मते कोणत्याही स्त्रीच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे प्रेमयुक्त आदर.
प्रेम असावं; पण त्यासोबत आदरही असावा. प्रेम झऱ्यासारखं असावं आणि आदर त्या झऱ्याला दिशा देणाऱ्या काठासारखा. दोन्हीशिवाय नातं एक तर कोरडं पडतं किंवा भरकटतं.
तिला आदर देणं म्हणजे फक्त तिच्याशी चांगल्या शब्दांत बोलणं नव्हे. तिचं आपल्या आयुष्यात असलेलं स्थान मनापासून स्वीकारणं, तिने आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी घेतलेल्या कष्टांची जाणीव ठेवणं, तिच्या विचारांना महत्त्व देणं, तिच्या भावनांचा आदर करणं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तिच्या अस्तित्वाचा सन्मान करणं.
“तू आहेस म्हणून हे घर आहे,” हे फक्त शब्दांनी सांगणं नव्हे; तर आपल्या वागण्यातून तिला ते जाणवून देणं म्हणजे प्रेमयुक्त आदर.
आणि ही जबाबदारी फक्त पुरुषांचीच आहे असंही नाही.
एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला आदरही तितकाच महत्त्वाचा आहे. सासूने सुनेला, सुनेने सासूला, बहिणीने बहिणीला, मैत्रिणीने मैत्रिणीला… एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या संघर्षाची, जबाबदाऱ्यांची आणि भावनांची जाणीव ठेवणं हेसुद्धा प्रेमयुक्त आदराचंच एक रूप आहे.
मग हा प्रेमयुक्त आदर द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं?
खरं तर फार मोठी गोष्ट नाही.
तिच्याशी बोलायचं.
तिला काय वाटतंय, हे विचारायचं.
तिचं मत आपोआप गृहीत धरायचं नाही.
“तिला हेच आवडत असेल,” असं समजण्यापेक्षा एकदा तिला विचारायचं.
स्वतःच्या आवडीनिवडीइतकंच तिच्याही आवडीनिवडींना महत्त्व द्यायचं.
घरासाठी ती जे करते, त्याकडे केवळ तिचं कर्तव्य म्हणून न पाहता त्यामागची तिची मेहनत समजून घ्यायची.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे—आपल्यासारखाच तिलाही स्वाभिमान आहे आणि तो तिलाही जपायचा आहे, याची जाणीव ठेवायची.
ही स्त्री आपल्या आयुष्यात कुठल्याही नात्याने जोडलेली असू शकते—आई, बहीण, पत्नी, मुलगी किंवा जिवाभावाची मैत्रीण.
प्रत्येक नात्यात तिची भूमिका वेगळी असते; पण प्रत्येक भूमिकेमागे एक समान सत्य असतं—
ती स्वतः एक व्यक्ती आहे.
आई म्हणून ती आपल्यासाठी अनेक गोष्टी करते.
पत्नी म्हणून ती संसाराची जबाबदारी उचलते.
मुलगी म्हणून ती घरात आनंद आणते.
बहीण म्हणून ती नकळत आयुष्यभराची सोबत देते.
आणि मैत्रीण म्हणून कधी कधी आपल्याला स्वतःपासूनही वाचवते.
या साऱ्या भूमिका निभावताना तिचं स्वतःचं मन कुठेतरी मागे पडत नाही ना, याचा विचार करणं गरजेचं आहे.
कारण स्त्रीला नेहमी महागडी भेटवस्तू, मोठमोठे शब्द किंवा सतत केलेली स्तुती हवी असतेच असं नाही.
कधी कधी तिला फक्त एवढंच ऐकायचं असतं—
“तू ठीक आहेस ना?”
आणि त्या एका प्रश्नात जर खरोखरची काळजी असेल, तर तिच्या मनाला त्याहून मोठी भेट दुसरी कोणती?
तिला प्रत्येक समस्येचं उत्तर नको असतं. कधी कधी फक्त कुणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं, एवढीच तिची अपेक्षा असते.
तिला बदलायचं नसतं.
तिच्यावर निर्णय लादायचा नसतो.
फक्त काही क्षण तिच्या बाजूने शांतपणे उभं राहायचं असतं.
कदाचित…
हाच तिच्या हृदयाकडे जाणारा खरा रस्ता असावा!
स्त्रीच्या मनाचा हा विषय तसा खूप गहन आहे. एका लेखात तो पूर्ण मांडणं शक्यच नाही. तिच्या भावनांची खोली आणि तिच्या मनाचा प्रवास समजून घेण्यासाठी कदाचित अनेक लेखही कमी पडतील.
पण वेळीच थांबलेलं बरं… नाही का?
मला तरी तिच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापडलाय—
प्रेमाचा… पण त्याला जोडलेल्या आदराचा.
प्रेमयुक्त आदराचा!
तुम्हाला काय वाटतं?
तुमच्या मते, तिच्या हृदयापर्यंत पोहोचणारा रस्ता कुठला?
तुमचा दृष्टिकोन, तुमचा अनुभव… तुमचं मन काय सांगतं, हेही मला नक्की जाणून घ्यायला आवडेल.
प्रत्येक दृष्टिकोन एक नवा अर्थ जोडतो… मलाही तुमचा ऐकायला आवडेल.
कदाचित तुम्हीही एकदा स्वतःच्या मनाचा आणि आपल्या आयुष्यातल्या त्या खास स्त्रीच्या मनाचा कौल घ्याल…
आणि कदाचित तुम्हालाही तिच्या हृदयापर्यंत जाणारा तो सुंदर मार्ग सापडेल…!
लवकरच… तुम्हालाही!
— ©® सौदामिनी निगुडकर
📧 kasturi.vibes@gmail.com













