चामोर्शीतील खुनाचा ४८ तासांत उलगडा; दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात
– वाघोली शिवारातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी उघडकीस आणला गुन्हा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ९ : चामोर्शी-मूल मार्गालगत वाघोली शिवारात आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा गुन्हा गडचिरोली पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणला. तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी साधलेल्या समन्वयातून मृतकाची ओळख पटविण्यात आली. या प्रकरणात दोन अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वाघोली शिवारात चामोर्शी-मूल मार्गालगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी चामोर्शी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाजवळ ओळख पटविण्यासाठी कोणतीही ठोस वस्तू किंवा कागदपत्रे नसल्याने मृतकाची ओळख पटविणे तसेच आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलिसांची विविध तपास पथके तयार करण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा करून तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला वेग देण्यात आला. सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. तसेच अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात तपासाचा आढावा घेत पथकांना आवश्यक सूचना दिल्या.
तपासादरम्यान शेजारील जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधत मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे मृतकाची ओळख नंदकिशोर मोतीलाल मिश्रा ऊर्फ बंटी (वय ३३, रा. मूल, जि. चंद्रपूर) अशी पटली.
मृतकाची ओळख पटताच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीय, साक्षीदार तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला. तपासात दोन अल्पवयीन बालकांचा गुन्ह्यात सहभाग असल्याची माहिती समोर आली. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अधिक तपासात खुनामागील घटनाक्रम उघडकीस आला.
पोलिसांच्या माहितीनुसार, मृतकाकडून अंमली पदार्थ मिळत असल्याची माहिती या दोन्ही बालकांना होती. त्यानुसार ७ सप्टेंबर रोजी ते मृतकासोबत वाघोली शिवारातील घटनास्थळी गेले. तेथे तिघांनी अंमली पदार्थ व मद्याचे सेवन केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही बालकांनी दगड तसेच मोटारसायकलमधील टी-रॉडने नंदकिशोर मिश्रा यांच्या डोक्यावर वार केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात सुरुवातीला मृतकाची ओळखही पटलेली नसताना तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपास करत पोलिसांनी अल्पावधीत गुन्ह्याचा छडा लावला. दोन्ही विधीसंघर्षग्रस्त बालकांना बाल न्याय मंडळ, गडचिरोली यांच्यासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास चामोर्शी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुमेध बन्सोडे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. चामोर्शीचे पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे, सहायक पोलीस निरीक्षक सुमेध बन्सोडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले, पोलीस उपनिरीक्षक शाहरू दंडे व पोलीस अंमलदारांनी तपासात सहभाग घेतला.













