सहाय्यक गटविकास अधिकाऱ्याविरोधात ४५ सरपंच एकवटले; कुरखेड्यात आंदोलन तीव्र
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. ०८ : पंचायत समितीतील सहाय्यक गटविकास अधिकारी देवांश उराडे यांच्या कार्यप्रणालीची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, या मागणीसाठी कुरखेडा तालुका सरपंच संघटनेचे ४५ सरपंच व विद्यमान प्रशासकांनी सुरू केलेल्या उपोषणाचा मंगळवारी पाचवा दिवस होता. अद्याप प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत उराडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ठोस पुरावे नसतानाही ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांना नोटिसा बजावून त्यांची सामाजिक व राजकीय बदनामी केली जात असल्याचा आरोप करण्यात आला. जुन्या शासन निर्णयांचा आधार घेऊन सरपंच व ग्रामसेवकांवर कारवाईचा दबाव निर्माण केला जात असल्याचेही संघटनेने म्हटले आहे.
काही ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे चित्र निर्माण करून सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा संघटनेने केला. तसेच कार्यालयीन उपस्थिती, वरिष्ठांना पूर्वसूचना न देता अनुपस्थित राहणे आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना विनाकारण त्रास देणे, असे आरोपही करण्यात आले.
सरपंच चुकीचे असतील तर सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन त्यांच्याशी थेट चर्चा करावी. ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष पाहणी न करता एकतर्फी कारवाई करणे योग्य नाही, अशी भूमिका संघटनेने मांडली.
दरम्यान, सावरखेडा येथील सरपंचाविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा संघटनेने केला. त्यांच्या जीवितास काही अनुचित घडल्यास त्याची जबाबदारी उराडे यांच्यावर राहील, असा गंभीर आरोपही करण्यात आला. या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.
दोन दिवसांत उराडे यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास ४५ सरपंच व विद्यमान प्रशासक आमरण उपोषण सुरू करतील, असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला.













