जांभळी–कारवाफा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात; वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०६ : धानोरा तालुक्यातील जांभळी–कारवाफा मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना विशेषतः दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
जांभळी ते कारवाफा हे अंतर सुमारे सात किलोमीटर आहे. त्यापैकी साखेरा–जांभळी टी-पॉइंट ते कारवाफा या सुमारे चार किलोमीटरच्या मार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. रस्ता ठिकठिकाणी उखडला असून मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या मार्गावरून दररोज नागरिक, विद्यार्थी व वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे प्रवासाचा वेळ वाढण्यासोबतच वाहनांचेही नुकसान होत आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
दरम्यान, संबंधित विभागाने या मार्गाची तातडीने पाहणी करून खड्डे बुजविण्यासह रस्त्याची आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews













