गडचिरोलीत ‘घरवापसी’नंतर विकासाची नवी वाट; १०० पुनर्वसित नागरिकांचा विशेष दौरा

14

गडचिरोलीत ‘घरवापसी’नंतर विकासाची नवी वाट; १०० पुनर्वसित नागरिकांचा विशेष दौरा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०३ : नक्षलवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतलेल्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता विकासाची जोड मिळत आहे. याच दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून सुमारे १०० पुनर्वसित नागरिकांचा विशेष गट गुरुवारी गडचिरोली पोलीस परिसरातून बेंगळुरू येथील ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ आश्रमाकडे रवाना झाला. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, लॉयड्स इनफिनिट फाउंडेशन आणि गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या विशेष गटाला रवाना करण्यासाठी पोलीस प्रशासनासह लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिपचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून नागरिकांना बेंगळुरूकडे रवाना करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते सोनू उर्फ मल्लोजुला वेणुगोपाळ ऊर्फ भूपती यांची उपस्थिती. एकेकाळी प्रमुख नक्षलवादी नेत्यांमध्ये गणना झालेल्या भूपती यांची नुकतीच गोंडवाना विद्यापीठात ‘ग्रामसभा समन्वयक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
या गटाचे नेतृत्व असिन राजाराम ऊर्फ अनिल करत आहेत. मुख्य प्रवाहात परतल्यानंतर त्यांनी नव्याने जीवनाची सुरुवात केली असून, गेल्या जवळपास दोन वर्षांपासून ते लॉयड्ससोबत कार्यरत आहेत.
यावेळी सोनू यांनी विविध संस्था पुनर्वसित नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत असल्याचे सांगितले. मुख्य प्रवाहात परतल्यानंतर समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी योगदान देत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

८०० हून अधिक नागरिक मुख्य प्रवाहात

२००५ ते २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात ८०० हून अधिक नागरिकांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात पुनरागमन केल्याची माहिती देण्यात आली. आत्मसमर्पणानंतर त्यांना सन्मानजनक रोजगार उपलब्ध करून देणे आणि समाजाशी पुन्हा जोडणे हे पुनर्वसन प्रक्रियेतील महत्त्वाचे आव्हान आहे.
गडचिरोली पोलीस प्रशासन आणि लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या पुढाकारातून शेकडो पुनर्वसित नागरिकांना कंपनीत कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

शेती-सिंचन प्रकल्पातून गावांना नवी दिशा

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’, लॉयड्स मेटल्स आणि गडचिरोली पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेती व सिंचनाशी संबंधित प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. सेंद्रिय शेती, बहुपीक पद्धती आणि सौरऊर्जेवर आधारित सिंचनासह आधुनिक व शाश्वत कृषी पद्धतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
या उपक्रमातून स्थानिक नागरिकांचे उत्पन्न वाढविणे, शेती अधिक सक्षम करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
लॉयड्स मेटल्सने ‘गडचिरोली फर्स्ट’ हा दृष्टिकोन स्वीकारत स्थानिक विकासाला प्राधान्य दिल्याचे सांगण्यात आले. स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी स्किल अकादमीची स्थापना करण्यात येत असून, हजारो युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे.
पोलीस प्रशासन, आयजी संदीप पाटील, पोलीस अधीक्षक एम. रमेश आणि लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पुढे नेला जात आहे.
नक्षलवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात आलेल्या नागरिकांना रोजगार, कौशल्य, शेती आणि सामाजिक विकासाच्या माध्यमातून सक्षम करण्याचा हा प्रयत्न गडचिरोलीच्या बदलत्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here