गडचिरोलीत माओवाद्यांची ‘घरवापसी’; ५० आत्मसमर्पित माओवादी मूळ जिल्ह्यात रवाना
– ‘प्रोजेक्ट संजीवनी’तून पुनर्वसनाला नवी दिशा, गडचिरोली पोलिसांसमोर आतापर्यंत ८१९ माओवाद्यांचे आत्मसमर्पण
The गडविश्व
गडचिरोली, दि.०१: हिंसाचाराचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात परतलेल्या ५० आत्मसमर्पित माओवादी सदस्यांची अखेर ‘घरवापसी’ झाली. गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सदस्यांना सोमवारी त्यांच्या मूळ जिल्ह्यात सुरक्षितपणे रवाना करण्यात आले. यानिमित्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
गडचिरोली जिल्ह्यात माओवादीविरोधी अभियानासोबतच शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणाला मिळालेल्या प्रतिसादामुळे अनेक जहाल माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा निर्णय घेतला. सन २००५ पासून राबविण्यात येत असलेल्या आत्मसमर्पण योजनेअंतर्गत आतापर्यंत ८१९ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पणानंतर संबंधित सदस्यांना सुरक्षित आणि सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार विविध पुनर्वसन लाभ देण्यात आले. यामध्ये आर्थिक मदत, शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता, रोजगार, स्वयंरोजगार तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणाचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुनर्वसन प्रक्रियेत असलेल्या ५० सदस्यांची आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्यात पाठविण्यात आले.
‘प्रोजेक्ट संजीवनी’तून नव्या आयुष्याची सुरुवात
गडचिरोली पोलीस दलाच्या ‘प्रोजेक्ट संजीवनी’च्या माध्यमातून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला व्यापक स्वरूप देण्यात आले आहे. केवळ प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी त्यांना नवी ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
या काळात त्यांच्या आरोग्याची तसेच शारीरिक व मानसिक क्षमतेची विशेष काळजी घेण्यात आली. ‘ऑपरेशन रोशनी’अंतर्गत नेत्रोपचार शिबिरे, आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन, ध्यान व योग शिबिरांचे आयोजन करण्यात आले. सामाजिक पुनर्वसनाला चालना देताना आतापर्यंत ४६ आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे सामूहिक विवाहही आयोजित करण्यात आले आहेत.
याशिवाय ८८ आत्मसमर्पित माओवाद्यांना लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षणासह रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘कुटुंबासोबत सुरक्षित व सन्मानाने जीवन जगा’
यावेळी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी आत्मसमर्पित सदस्यांना मार्गदर्शन करताना, उपलब्ध कौशल्यांचा उपयोग करून आत्मनिर्भर व्हावे, कुटुंबासोबत सुरक्षित व सुखी जीवन जगावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने पुढे जावे, असे आवाहन केले. आत्मसमर्पित सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गडचिरोली पोलीस दल कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनीही मनोगत व्यक्त करत पुनर्वसनाच्या काळात पोलीस दलाकडून वेळोवेळी मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, सहायक पोलीस अधीक्षक धानोरा सुयश कुमार सिंग, सहायक पोलीस अधीक्षक भामरागड सागर भामरे आणि पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील उईके यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल तसेच शाखेतील अंमलदारांनी परिश्रम घेतले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #GadchiroliNews #GadchiroliPolice #MaoistSurrender #MaoistRehabilitation #Naxalism #NaxalFreeGadchiroli #ProjectSanjeevani #MaharashtraPolice #MaharashtraNews #MaoistHomecoming #Rehabilitation #SurrenderPolicy #NaxalNews













