नवजात बाळासाठी धावले गडचिरोलीचे पोलीस ; रक्तदानातून जपली माणुसकी

18

नवजात बाळासाठी धावले गडचिरोलीचे पोलीस ; रक्तदानातून जपली माणुसकी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०१ : मुदतपूर्व जन्मलेल्या तिळ्या नवजात बालकांपैकी एका बालिकेची प्रकृती अचानक खालावली. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली; मात्र आवश्यक रक्तगट रुग्णालयात उपलब्ध नव्हता. अशा गंभीर परिस्थितीत गडचिरोली पोलिसांनी तत्परता दाखवत रक्ताची व्यवस्था केली. पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांनी स्वेच्छेने रक्तदान करत नवजात बाळाला उपचारासाठी आवश्यक रक्त उपलब्ध करून दिले.
एटापल्ली तालुक्यातील ३२ वर्षीय शांता गावडे यांनी २२ ऑगस्ट रोजी हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल रुग्णालयात तिळ्या बालकांना जन्म दिला. मुदतपूर्व जन्म आणि कमी वजनामुळे तिन्ही नवजात बालकांना विशेष वैद्यकीय देखरेखीखाली एनआयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान तिन्ही बालकांची प्रकृती स्थिर असताना २८ ऑगस्ट रोजी त्यापैकी एका बालिकेची प्रकृती अचानक चिंताजनक बनली. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याने डॉक्टरांनी तातडीने रक्ताची आवश्यकता असल्याचे सांगितले.
मात्र, आवश्यक रक्तगटाचे रक्त रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाशी संपर्क साधला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली नागरी कृती शाखेने तातडीने पुढाकार घेतला. गडचिरोली रक्त केंद्राच्या सहकार्याने आवश्यक रक्ताची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक कार्यालयातील ऑपरेशन सेलमध्ये कार्यरत पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि नागरी कृती शाखेतील महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांनी पुढाकार घेत स्वेच्छेने रक्तदान केले. त्यांच्या तत्परतेमुळे नवजात बालिकेसाठी आवश्यक रक्तगटाच्या दोन रक्तपिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या. वेळेत रक्त उपलब्ध झाल्याने बालिकेवरील उपचारास मोठी मदत झाली असून तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
संकटाच्या क्षणी पोलिसांनी दाखविलेल्या या माणुसकीच्या भूमिकेबद्दल नवजात बालिकेच्या आई-वडिलांसह रुग्णालय प्रशासनाने गडचिरोली पोलीस दलाचे मनःपूर्वक आभार मानले. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही तातडीने रक्तदान करून नवजात बालिकेच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद बंडीगरे आणि महिला पोलीस अंमलदार आचल कुमरे यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here