गडचिरोली : आठवडाभरात दोन मातांचा मृत्यू , महिला व बाल रुग्णालयातील प्रसूतीसेवा संशयाच्या भोवऱ्यात
– बाळाच्या मृत्यूनंतर प्रसूती झालेल्या महिलेनेही सोडला जीव; नातेवाईकांचा आरोग्य यंत्रणेवर निष्काळजीपणाचा आरोप
The गडविश्व
गडचिरोली, दि.३१ : जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील प्रसूतीसेवेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आणखी एक घटना समोर आली आहे. चामोर्शी येथील गर्भवती महिलेच्या मृत्यूला आठवडा पूर्ण होत नाही तोच प्रसूतीनंतर एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, प्रसूतीनंतर तिच्या नवजात बाळाचाही काही वेळातच मृत्यू झाला. नाजुका दिवाकर राऊत (२८, रा. कोजबी, ता. नागभीड, जि. चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
नाजुका यांचे माहेर सावली तालुक्यातील चकपिरंजी येथे आहे. प्रसूतीसाठी त्यांना बोदली प्राथमिक आरोग्य केंद्रातून २८ ऑगस्ट रोजी रात्री १.२३ वाजता गडचिरोलीतील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता त्यांची सामान्य प्रसूती झाली. अडीच किलो वजनाच्या बाळाचा जन्म झाला; मात्र काही वेळातच नवजात बाळाचा मृत्यू झाला.
यानंतर सकाळी ८ वाजताच्या सुमारास नाजुका यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. प्रकृती गंभीर होत असल्याने ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण किलनाके आणि डॉ. प्रशांत आखाडे यांना पाचारण करण्यात आले. डॉक्टर दाखल झाल्यानंतर महिलेवर तातडीने उपचार करण्यात आले. रक्तस्त्राव थांबविण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर रक्तस्त्राव नियंत्रणात आला आणि नाजुका यांना रक्त देण्यात आले.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. सायंकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र, मध्यरात्रीनंतर अचानक त्यांना झटके येण्यास सुरुवात झाली. उपचारांची शर्थ सुरू असतानाच ३० ऑगस्टच्या पहाटे १.३० वाजताच्या सुमारास नाजुका यांचा मृत्यू झाला.
रक्तासाठी प्रतीक्षा करावी लागल्याचा आरोप
महिलेची प्रकृती गंभीर असताना रक्त उपलब्ध होण्याच्या प्रक्रियेला विलंब झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. वेळेत आवश्यक उपचार आणि रक्त मिळाले असते तर परिस्थिती वेगळी असती, असा दावा करत त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आई आणि बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
आठ दिवसांत दोन मृत्यू; प्रसूतीसेवेची गुणवत्ता तपासण्याची गरज
या घटनेमुळे जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील प्रसूतीसेवेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आठ दिवसांपूर्वी चामोर्शी येथील जिजा सातर (२६) यांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर आता नाजुका राऊत आणि त्यांच्या नवजात बाळाच्या मृत्यूने चिंता अधिक वाढली आहे. सलग घडलेल्या या घटनांची पार्श्वभूमी पाहता रुग्णालयातील प्रसूती व्यवस्थापन, आपत्कालीन उपचार, रक्ताची उपलब्धता तसेच डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रतिसादाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
या प्रकरणाबाबत रुग्णालय प्रशासनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. किलनाके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नाजुका यांच्या मृत्यूमागील नेमकी वैद्यकीय कारणे आणि उपचार प्रक्रियेत काही त्रुटी झाल्या का, याचे उत्तर आता चौकशीतूनच स्पष्ट होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #womenhospital #Gadchiroli #GadchiroliNews #MaharashtraNews #HealthNews #HospitalNews #WomenAndChildHospital #MaternalDeath #NewbornDeath #MaternalHealth #Healthcare #HealthDepartment #MedicalNegligence #GadchiroliHospital #BreakingNews #Maharashtra #TheGadVishwa













