गडचिरोलीत ‘संडे ऑन सायकल’चा जल्लोष ; विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

20

गडचिरोलीत ‘संडे ऑन सायकल’चा जल्लोष ; विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा कार्यालय आणि सायकल स्नेही मंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ३० ऑगस्ट) ‘संडे ऑन सायकल’ सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. इंदिरा गांधी चौक ते क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड या मार्गावर झालेल्या या रॅलीत विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नगराध्यक्ष ॲड. प्रणोती सागर निंबाळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात केली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी घाटोळे, सायकल स्नेही मंडळाचे जिल्हा सरचिटणीस उदय धकाते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सामाजिक कार्यकर्ते उपेंद्र रोहनकर, प्रा. सुनीता साळवे, सुचिता धकाते आदी उपस्थित होते.
रॅलीदरम्यान नगराध्यक्ष ॲड. प्रणोती निंबाळकर यांनी सायकल चालविण्याचे आरोग्यदायी महत्त्व अधोरेखित केले. नियमित सायकलिंगमुळे शरीर तंदुरुस्त राहण्यासोबतच पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात सायकलचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नर्सरीतील चिमुकला ठरला आकर्षण

रॅलीत नर्सरीमध्ये शिकणारा बाल सायकलप्रेमी अश्वित प्रवीण रक्षमवार विशेष आकर्षण ठरला. या चिमुकल्याने इंदिरा गांधी चौक ते बसस्थानकापर्यंत सायकल चालवत रॅलीत उत्साह वाढविला.
महान हॉकीपटू स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. क्रीडा संस्कृतीला चालना देणे, आरोग्यविषयक जागृती निर्माण करणे आणि युवकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे या उद्देशाने ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.रॅलीमध्ये वसंत विद्यालय, राणी दुर्गावती कन्या विद्यालय, विद्याभारती विद्यालय, शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय आणि स्वामी विवेकानंद कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच शिक्षक-शिक्षिका सहभागी झाले. सायकल स्नेही मंडळाचे मुरलीधर दोनाडकर, विजय साळवे, वरुण धोडरे, उल्हास आखाडे, गिरीष कांबळे, कुणाल पेंदोरकर, सुभाष धंदरे, गुरुदेव रोहनकर, शरद गिऱ्हिपुंजे यांच्यासह मंडळाचे सदस्य आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
इंदिरा गांधी चौक–बसस्थानक–क्रीडा प्रबोधिनी, पोटेगाव रोड या मार्गावरून रॅली उत्साहात पार पडली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ऋषिकांत पापडकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here