गॅरापत्तीच्या आठवडी बाजारात पोलिसांचे आरोग्य शिबिर; ८४ नागरिकांची तपासणी
– मोफत औषधोपचारासह आरोग्यविषयक मार्गदर्शन; शहीद जवानांच्या बलिदानाचीही जनजागृती
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मौजा गॅरापत्ती येथे आठवडी बाजारादरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलीस रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. १६) आयोजित या शिबिरात ८४ नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात पोलीस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश चिचघरे, डॉ. रोशनी किरंगे तसेच परिचारिका लीना नगराळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी करण्यात आली. गरजेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. विविध आजार, पोषण समस्या आणि आरोग्यविषयक काळजीबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. एका नागरिकाला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी संबंधित रुग्णालयात जाण्याची शिफारस करण्यात आली.
४३ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी
गडचिरोली पोलीस दलाकडून २०२१ पासून आतापर्यंत २०६ आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून ४३ हजारांहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच सहा रक्तदान शिबिरांतून ४ हजार ८६४ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. ‘ऑपरेशन रोशनी’च्या माध्यमातून ९ हजार ९७१ हून अधिक नागरिकांची नेत्र तपासणी, तर १ हजार ४१२ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहीद जवानांच्या बलिदानाचीही जनजागृती
आरोग्य शिबिरासोबतच आठवडी बाजारात फिरत्या प्रदर्शनाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या जवानांचे बलिदान, सी-६० जवानांचे शौर्य तसेच पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांची माहिती नागरिकांना देण्यात आली. विविध बॅनर व माहितीफलकांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) सुनील ऊईके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, धानोरा जगदीश पांडे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस ठाणे गॅरापत्तीचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय निकम, पोलीस उपनिरीक्षक दिनेश खांडेकर व पोलीस अंमलदारांनी शिबिराचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या पार पाडले.













