‘जिल्हाधिकारी जवाब दो!’; कोठी–कोरणार पूल प्रकरणी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

22

‘जिल्हाधिकारी जवाब दो!’; कोठी–कोरणार पूल प्रकरणी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव
The गडविश्व
गडचिरोली, दि. १८ : मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेला कोठी–कोरणार पूल २९ जुलै रोजी कोसळून २० दिवस उलटले, तरीही संबंधित अधीक्षक अभियंता व कंत्राटदारावर ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे. या पार्श्वभूमीवर १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव व चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.
पूल कोसळल्याप्रकरणी संबंधित अधीक्षक अभियंत्यांचा अतिरिक्त पदभार काढून घेण्यात आला. मात्र, ही कारवाई नसून केवळ प्रकरणावर पांघरूण घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप आजाद समाज पार्टीने केला आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देऊन संबंधित अधीक्षक अभियंता व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून ‘जिल्हाधिकारी जवाब दो!’ अशी भूमिका घेत दोषी अधीक्षक अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.
दरम्यान, कोठी–कोरणार पूल प्रकरणापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ५५० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांमध्ये अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या सर्व कामांची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणीही आंदोलनादरम्यान करण्यात येणार आहे.
देशातील नामांकित कंपन्यांनी निविदा भरलेल्या असताना काही विशिष्ट कंपन्यांना कामे देण्यात आल्याच्या प्रक्रियेचीही चौकशी करावी, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
हे आंदोलन आजाद समाज पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आदिवासी विकास युवा परिषद आणि बिरसा ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे.
‘जनतेच्या पैशाचा हिशोब द्या आणि दोषींवर कारवाई करा. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल,’ असा इशारा आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here