झाडीपट्टी रंगभूमीला बळ द्या; कलाकारांच्या मानधनात वाढ करा – महेंद्र ब्राह्मणवाडे
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : पूर्व विदर्भाची सांस्कृतिक ओळख असलेली झाडीपट्टी रंगभूमी जिवंत राहणे काळाची गरज असून या कलेवर उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो कलाकारांच्या मानधनात शासनाने वाढ करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली.
ओम शिव ओम साई कला रंगभूमीद्वारे संचालित वेदांत नाट्यकला मंच प्रस्तुत ‘लग्नपाठ’ या नाटकाच्या विमोचन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी त्यांनी झाडीपट्टी रंगभूमीने अनेक गुणी कलाकार घडवून त्यांना चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचविल्याचे सांगत, ही समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी शासनाने कलाकारांना अधिक आर्थिक बळ देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, धानोरा तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत कोराम, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, जावेद खान, नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर यांच्यासह कलाकार के. रविकुमार, प्रभाकर गडपायले, राज बोबाटे, प्रशांत चौधरी, करण मंगमोडे, प्रफुल भरडकर, किशोर कापगते, प्रफुल किलनाके तसेच लता निंदेकर, सुप्रिया मोटघरे, अश्विनी, रेश्मा रंभाळ आणि मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. कार्यक्रमात ‘लग्नपाठ’ नाटकाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देत झाडीपट्टी नाट्यचळवळ अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.













