खासदार डॉ.किरसान यांच्या पाठपुराव्याला यश ; आदिवासी विकास विभागाने परीक्षा केंद्रांमध्ये केला बदल
– उमेदवारांना दिलासा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २७ : आदिवासी विकास विभागाच्या चौकीदार (गट-ड) पदांच्या भरती परीक्षेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या केंद्राऐवजी ७४६ किलोमीटर दूर धाराशिवसह अन्य ठिकाणी परीक्षा केंद्र देण्यात आल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या प्रकरणी गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांनी आदिवासी विकास मंत्र्यांकडे तातडीने हस्तक्षेप करून परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आदिवासी विकास विभागाने परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामार्फत ४७८ चौकीदार (गट-ड) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरताना उमेदवारांना गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया व भंडारा ही परीक्षा केंद्रे निवडण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र अनेक उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या केंद्राऐवजी दूरवरची परीक्षा केंद्रे मिळाल्याने प्रवास, निवास, आर्थिक खर्च आणि वेळेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय अन्यायकारक असल्याचे खासदार किरसान यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिले होते.
या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास आयुक्तालयाने सुधारित सूचना जारी केली आहे. त्यानुसार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांची २८ जुलै रोजी शिफ्ट २ मध्ये होणारी परीक्षा आता २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता (शिफ्ट-१) घेण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांनी सुधारित प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, इतर प्रकल्पांतील ज्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीच्या परीक्षा केंद्राऐवजी दूरवरची केंद्रे देण्यात आली होती, त्यांची परीक्षा केंद्रे त्यांच्या पूर्वीच्या पसंतीनुसार बदलण्यात येणार आहेत. मात्र परीक्षेच्या तारखेत कोणताही बदल होणार नसून, सर्व संबंधित उमेदवारांनी सुधारित अॅडमिट कार्ड डाउनलोड करून आवश्यक नोंद घ्यावी, असे आदिवासी विकास आयुक्तालयाचे अपर आयुक्त (मुख्यालय) दिगंबर चव्हाण यांनी प्रसिद्ध केलेल्या सूचनेत नमूद केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #NamdevraoKirsan #MPKirsan #TribalDevelopment #Recruitment2026 #ExamCentre #ExamUpdate #StudentsRelief #GovernmentJobs #Maharashtra #AdivasiDevelopment #CompetitiveExams #EducationNews #JobAlert #TheGadVishva













