धानोरा शहरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोझर : मुख्य बाजारपेठ मोकळी

62

धानोरा शहरातील अतिक्रमणावर प्रशासनाचा बुलडोझर : मुख्य बाजारपेठ मोकळी
– पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्ह्याचा इशारा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०४ : शहरातील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी व नागरिकांच्या गैरसोयीचे कारण ठरलेल्या अतिक्रमणावर शुक्रवारी तालुका प्रशासन आणि नगरपंचायतीने संयुक्त धडक कारवाई करत मुख्य बाजारपेठ अतिक्रमणमुक्त केली. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगत उभारण्यात आलेले अनधिकृत व्यवसाय, पत्र्यांचे शेड तसेच पक्के अतिक्रमण हटविण्यात आल्याने शहरातील वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
शुक्रवारी सकाळी सुमारे ९ वाजता नगरपंचायतीच्या विशेष पथकाने जेसीबी, ट्रॅक्टर आणि पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली. तहसीलदार गणेश माळी, मुख्याधिकारी प्रितीश मगरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले यांच्या उपस्थितीत गांधी चौक, बसस्थानक परिसर, तहसील कार्यालय मार्ग तसेच आठवडी बाजार परिसरातील रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले. रस्त्यांच्या कडेला उभारलेले अनधिकृत व्यवसाय, पत्र्यांचे शेड आणि दुकानदारांनी केलेले पक्के बांधकाम जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. नगरपंचायतीचे बांधकाम विभागप्रमुख मंगेश नाकाडे, अभियंता वीणा सहारे, कर निरीक्षक तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
या कारवाईनंतर शहरातील वाहतूक पूर्ववत सुरळीत झाली असून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ही मोहीम केवळ मुख्य बाजारपेठेपुरती मर्यादित न ठेवता शहरातील इतर भागांतील अतिक्रमणही तातडीने हटवावे आणि पुन्हा अतिक्रमण होणार नाही, यासाठी प्रशासनाने सातत्याने देखरेख ठेवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी प्रितीश मगरे यांनी अतिक्रमणधारकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, “धानोरा शहर कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवणे हे नगरपंचायतीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हटविण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण करण्याचा किंवा रस्ता अडवून व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील.”
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here