गडचिरोली पोलीस दलाचा गौरव; पाच सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नत
The गडविश्व
मुंबई/गडचिरोली, दि.०३ : माओवादविरोधी अभियानात धाडसी कारवाया, उत्कृष्ट कामगिरी आणि कर्तव्यनिष्ठ सेवेची दखल घेत गडचिरोली पोलीस दलातील पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षक पदावर वेगवर्धित पदोन्नती देण्यात आली. मुंबई येथील पोलीस महासंचालक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पिपिंग समारंभात पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पदोन्नतीची चिन्हे प्रदान करून अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
वेगवर्धित पदोन्नती प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये योगिराज जाधव, सचिन झनक, बाबासाहेब दुधाळ, सुनील बागल आणि राहुल देव्हडे यांचा समावेश आहे. गडचिरोलीसारख्या अतिसंवेदनशील व माओवादग्रस्त जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि समर्पित भावनेने बजावलेल्या उल्लेखनीय सेवेमुळे या अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्यात आली आहे.
यावेळी सदानंद दाते यांनी पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. माओवादविरोधी अभियानातील अनुभव, विविध आव्हाने आणि दुर्गम भागात बजावलेल्या कर्तव्यामुळे गडचिरोली पोलीस दलाने राज्यात वेगळी ओळख निर्माण केल्याचे त्यांनी नमूद केले. उत्कृष्ट कार्याचा सन्मान होत असल्याने पोलीस दलात शौर्य, गुणवत्ता आणि कर्तव्यनिष्ठेला अधिक बळ मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
समारंभाला अपर पोलीस महासंचालक (एटीएस) नवल बजाज, अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) डॉ. निखिल गुप्ता, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलीस महासंचालक (सायबर) यशस्वी यादव, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक सागर पाटील, पोलीस अधीक्षक (डायल ११२) प्रशांत मोहिते तसेच गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश उपस्थित होते. पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनीही पदोन्नतीप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्यपूर्ण कामगिरीची दखल राष्ट्रीय स्तरावर सातत्याने घेतली जात आहे. आजपर्यंत या दलाला ३ शौर्यचक्र, ६ राष्ट्रपती पोलीस शौर्य पदके, ३३८ पोलीस शौर्य पदके, २० राष्ट्रपती गुणवत्ता सेवा पदके आणि १,५१० पोलीस महासंचालक पदके प्राप्त झाली आहेत. तसेच आतापर्यंत ४०४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती मिळाली असून, नव्या पदोन्नतीमुळे गडचिरोली पोलीस दलाच्या शौर्यशाली परंपरेत आणखी एका मानाच्या अध्यायाची भर पडली आहे.













