गडचिरोलीला केंद्रीय विद्यालयाची अखेर मंजुरी ; ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया, यंदाच पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू

155

गडचिरोलीला केंद्रीय विद्यालयाची अखेर मंजुरी ; ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया, यंदाच पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : गडचिरोली जिल्ह्यासाठी बहुप्रतीक्षित असलेल्या केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेने गडचिरोली येथे नवीन केंद्रीय विद्यालय सुरू करण्यास अधिकृत मान्यता दिली असून, चालू शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून विद्यालय प्रत्यक्ष सुरू होणार आहे. पुढील ३० दिवसांत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून इयत्ता पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली.
भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत केंद्रीय विद्यालय संघटनेने २ जुलै २०२६ रोजी याबाबतचा अधिकृत आदेश जारी केला. मार्च २०१९ मध्ये देशभर मंजूर करण्यात आलेल्या ५० नवीन केंद्रीय विद्यालयांपैकी गडचिरोलीतील हे विद्यालय एक आहे.
सध्या विद्यालयाचे वर्ग शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा, सेमाना बायपास रोड, गडचिरोली येथे तात्पुरत्या स्वरूपात भरविण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक वर्गखोल्या व इतर सुविधा जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या असून, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी नागरी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक इयत्तेचा एक विभाग सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील वर्ग सुरू करण्याची योजना आहे. प्रवेश प्रक्रिया, कर्मचारी नियुक्ती आणि इतर आवश्यक प्रशासकीय औपचारिकता वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत.
दरम्यान, तात्पुरत्या इमारतीत शाळा सुरू होत असतानाच केंद्रीय विद्यालयाच्या कायमस्वरूपी भव्य इमारतीच्या उभारणीची प्रक्रियाही समांतरपणे सुरू करण्यात येणार आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना आधुनिक सुविधा, दर्जेदार पायाभूत व्यवस्था आणि राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध होणार असल्याने जिल्ह्यातील पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
केंद्रीय विद्यालय सुरू होण्याच्या निर्णयामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली असून, शिक्षण क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews #localnews
#Gadchiroli #KendriyaVidyalaya #KV #Education #SchoolEducation #NewSchool #QualityEducation #EducationForAll #StudentSuccess #FutureReady #AdmissionsOpen #IndiaEducation #AcademicYear2026 #GovernmentInitiative #EducationalDevelopment #Maharashtra #SchoolAdmission #Learning #BrightFuture #NewsUpdate

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here