बैलबंडीवरील मिरवणुकीतून चिमुकल्यांचे स्वागत; गुंजाळा शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात

67

बैलबंडीवरील मिरवणुकीतून चिमुकल्यांचे स्वागत; गुंजाळा शाळेचा प्रवेशोत्सव उत्साहात
The गडविश्व
गुंजाळा, दि. ०२ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गुंजाळा येथे नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करत प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सजविलेल्या बैलबंडीत विद्यार्थ्यांना बसवून संपूर्ण गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले.
प्रभात फेरीदरम्यान शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश देत “गावातील प्रत्येक मुलगा-मुलगी शिक्षित व्हावी” हा सामाजिक संदेश ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आला. शाळा ही केवळ शिक्षणाचे केंद्र नसून समाजघडणीची महत्त्वाची संस्था असल्याची जाणीवही या माध्यमातून करून देण्यात आली.
यानंतर शाळा परिसरात विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, बौद्धिक आणि मनोरंजक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहभागाची भावना आणि शिक्षणाविषयीची आवड वाढण्यास मदत झाली. कार्यक्रमात पालकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने शाळा व पालक यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाला.
या कार्यक्रमाला शिक्षक श्रीरंग ननावरे, ज्ञानेश्वर कुलमेथे, सरपंच मधुकर चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा अश्विनीताई धोटे, सदस्य तेजस्विनीताई चौधरी, विनायक चौधरी, राजेंद्र गोवारधिपे, ‘सीखें’ संस्थेचे जिल्हा समन्वयक विरेंद्र देशमुख, विषयतज्ज्ञ मोहन सर तसेच कोच सोमेश्वर पेंदाम, शिवशंकर बांदुरकर आणि कल्पेश माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी आपुलकी निर्माण झाली असून शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. तसेच गावपातळीवर शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक बालकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रभावी संदेश या प्रवेशोत्सवातून देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here