कोरची : भरधाव दुचाकी झाडावर आदळली, चालकाचा जागीच मृत्यू-एक गंभीर जखमी
– कोरची-मसेली मार्गावरील भीषण अपघात
The गडविश्व
ता.प्र/ कोरची, दि. २९ : मसेली-कोरची मार्गावर रविवारी दुपारी भरधाव दुचाकी रस्त्यालगतच्या झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर स्थानिक युवकाने दाखविलेल्या तत्परतेमुळे जखमीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर वेळेत उपचार सुरू होऊ शकले.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश प्रभाकर कारेमोरे (४६, रा. राजगोपालचारी वॉर्ड, भंडारा) व रामनिवास सुंदर लोधी (३५, रा. झाशी) हे दुचाकीने देवरीहून कोरचीकडे येत होते. कोरची येथे सुरू असलेल्या मेळ्यातील झुल्याच्या इंजिनाची दुरुस्ती करण्यासाठी ते येत असताना दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास मसेली-कोरची मार्गावर हा अपघात घडला.
दुचाकीचा वेग जास्त असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट रस्त्यालगतच्या झाडावर आदळली. या भीषण धडकेत चालक नितेश कारेमोरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर रामनिवास लोधी गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कोरची पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रशांत कराडे यांनी कोणताही विलंब न करता जखमीला रुग्णालयात पोहोचविण्यास मदत केली. त्यांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले. त्यांच्या या सामाजिक कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.
या प्रकरणी कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी वाहनचालकांनी अतिवेग टाळून वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन केले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #accident #korchi













