धानोरा : अवैध रेती तस्करांवर महसूल विभागाचा पुन्हा दणका, रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त
The गडविश्व
ता. प्र/धानोरा,दि. २८ : धानोरा तालुक्यात अवैध रेती तस्करीविरोधात महसूल विभागाने धडक कारवाईची मोहीम सुरू ठेवत आणखी एका बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली आहे. माळंदा शिवारातून विनापरवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाला माळंदा परिसरात अवैध रेती उपसा करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने सापळा रचून संबंधित ट्रॅक्टर ताब्यात घेतला. जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर पवनी (ता. धानोरा) येथील रहिवासी श्रीमती जानकी दानू बोगा यांच्या मालकीचे असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी ते धानोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
गौण खनिज चोरीला आळा घालण्यासाठी तहसीलदार गणेश माळी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक सातत्याने कारवाया करत आहे. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी मोहित किरंगे, निखिल मेश्राम, नरेंद्र मेश्राम, रमेश कावळे तसेच महसूल सेवक मारुती पदा यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.
दरम्यान, नदीपात्रातून बेकायदेशीर रेती उपसा किंवा विनापरवाना रेती वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कडक दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा तहसीलदार गणेश माळी यांनी दिला आहे.













