आंधळीतील घरफोडीचा 24 तासांत छडा ; दोन आरोपी जेरबंद

100

आंधळीतील घरफोडीचा 24 तासांत छडा ; दोन आरोपी जेरबंद
– कुरखेडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई, चोरीचे सोने व रोख रक्कम हस्तगत
The गडविश्व
कुरखेडा, दि.१९ : तालुक्यातील आंधळी येथे घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा अवघ्या 24 तासांत छडा लावत कुरखेडा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेले सोने व रोख रक्कम असा एकूण 56 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात वाढत्या चोरी व घरफोडीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी सर्व पोलीस ठाण्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार कुरखेडा पोलिसांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
मिळालेल्या माहितीनुसार, आंधळी येथील रहिवासी अशोककुमार वाघमारे हे 12 जून ते 15 जून दरम्यान कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातून 3 हजार रुपये रोख, गुल्लकातील सुमारे 7 हजार रुपये तसेच 10 ग्रॅम वजनाचा सुमारे 50 हजार रुपये किमतीचा सोन्याचा गोफ असा एकूण 60 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 331(3), 331(4) व 305 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे न सोडल्याने तपास पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत होता. मात्र तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक नेटवर्कच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान पोलिसांनी वैभव समीर जांभूळकर (वय 29) आणि गणेश देविदास भैसारे (वय 33), दोघेही रा. आंधळी, ता. कुरखेडा यांना 16 जून रोजी अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले 10 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा एकूण 56,080 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कुरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
चोरीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपींना अल्पावधीत अटक करणाऱ्या कुरखेडा पोलिसांच्या तत्पर कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here