शिवनीत शेतातील फार्महाऊसवर पोलिसांची धाड ; एक लाखांचा देशी दारूसाठा जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही अवैधरित्या देशी दारूची साठवणूक करून विक्री करणाऱ्यांविरोधात गडचिरोली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. शिवनी येथील एका शेतातील फार्महाऊसवर टाकलेल्या धाडीत एक लाख रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या निर्देशानुसार सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 17 जून रोजी ही कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शिवनी येथील किरण शंकर ताडपल्लीवार यांच्या शेतातील फार्महाऊसवर छापा टाकला.
तपासणीदरम्यान शेतातील घराजवळ जमिनीखाली तयार केलेल्या सिमेंटच्या टाकीत देशी दारूचा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच हा साठा पेटवून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, टाकीमधून 90 एमएल क्षमतेच्या अर्धवट जळालेल्या तब्बल 2 हजार निपा पोलिसांनी जप्त केल्या. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी किरण शंकर ताडपल्लीवार (वय 37, रा. शिवनी) हा फरार आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिसांनी यशस्वीरीत्या पार पाडली.













