कुरखेडा पोटनिवडणुकीत भाजपसमोर नवे आव्हान ; कमळाच्या प्रचारातून नगरसेवक गायब, राजकीय चर्चांना उधाण
– प्रभाग १६ मध्ये भाजपच्या अंतर्गत नाराजीची कुजबूज, काँग्रेस कार्यकर्त्यांचा प्रचार मात्र जोमात
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. १३ : कुरखेडा नगर पंचायतच्या प्रभाग क्रमांक १६ च्या पोटनिवडणुकीने राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. दोन्ही पक्षांनी प्रचाराला वेग दिला असला तरी भाजपच्या प्रचारात पक्षाचे काही विद्यमान नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी सक्रिय दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
अनुसूचित जमाती महिला आरक्षित असलेल्या या प्रभागात भाजपच्या निलिमा जयराम हरामी तर काँग्रेसच्या प्रतिभा रवी उईके या निवडणूक रिंगणात आहेत. मागील निवडणुकीत याच प्रभागातून भाजपने अत्यंत कमी मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यामुळे ही जागा पुन्हा एकदा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.
अशा परिस्थितीत भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पक्षाची संपूर्ण ताकद मैदानात उतरलेली दिसणे अपेक्षित असताना काही नगरसेवकांची प्रचारातील अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरत आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू झाला, बॅनर आणि फलक झळकू लागले, मात्र पक्षाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असलेले काही लोकप्रतिनिधी अद्याप प्रचारात सक्रिय का दिसत नाहीत, असा प्रश्न मतदारांमधून उपस्थित केला जात आहे.
दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारात स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह दिसून येत असून पक्षाने प्रचार यंत्रणा अधिक गतिमान केल्याचे चित्र आहे. भाजपमधील कथित नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
प्रचाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात दिसणारी ही शांतता केवळ राजकीय रणनीतीचा भाग आहे की पक्षांतर्गत नाराजीचे संकेत, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे. येत्या काही दिवसांत प्रचार अधिक रंगात आल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर मिळणार असले तरी सध्या प्रभाग क्रमांक १६ मधील राजकीय घडामोडींनी कुरखेड्यात चर्चांना चांगलेच उधाण आणले आहे.
#thegdv #thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














