वडसा रेल्वे अंडरपास मार्ग २ जुलैपर्यंत बंद ; नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा
– रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय ; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : वडसा रेल्वे स्थानकाजवळील एलएचएस-५९ (रेल्वे बोगदा अंडरपास) मार्गावरील दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने या मार्गावरील वाहतूक १० जून ते २ जुलै २०२६ या कालावधीत बंद ठेवण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जारी केले आहेत.
वडसा रेल्वे स्थानकाजवळील अंडरपास मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. परिणामी अपघात आणि वाहतूक कोंडीची शक्यता वाढत असल्याने रेल्वे विभागाच्या विनंतीनुसार तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सदर मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
दरम्यान, प्रवासी बसेस, पाणीपुरवठा, महावितरण, रस्ते दुरुस्ती आणि अन्य अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. मात्र इतर सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गावरून वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८, भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #Gadchiroli #Wadsa #TrafficUpdate #RailwayUnderpass #RoadRepair #PublicNotice #MaharashtraNews














