बनावट वजनकाट्यांचा गडचिरोलीतही शिरकाव?; विशेष तपासणी मोहिमेची मागणी
– ग्राहक पंचायतचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेद, दोषींवर फौजदारी कारवाईची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे बनावट ब्रँडचे स्टिकर लावून व बनावट बिलबुकांच्या माध्यमातून वजनकाट्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यातही विशेष तपासणी मोहीम राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ग्राहक पंचायत, गडचिरोलीने जिल्हाभरातील वजनकाटे व मोजमाप साधनांची सखोल तपासणी करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष उदय धकाते यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सहाय्यक नियंत्रक वैधमापन शास्त्र विभाग तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनानुसार, ब्रह्मपुरी हे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला, अन्नधान्य, किराणा माल व इतर जीवनावश्यक वस्तूंची आवक-जावक होत असते. त्यामुळे ब्रह्मपुरी येथे उघडकीस आलेल्या गैरप्रकाराचा परिणाम गडचिरोलीतील ग्राहकांवरही झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्राहक पंचायतने जिल्ह्यातील किराणा दुकाने, धान्य खरेदी केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, भाजी मंडई, सराफा दुकाने, हार्डवेअर दुकाने, व्यापारी संकुले, पेट्रोल पंप तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वजनकाट्यांची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे. अप्रमाणित किंवा नियमबाह्य वजनकाट्यांमुळे ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत असल्यास त्याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्राहक पंचायतने प्रशासनाकडे सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबविणे, सर्व वजनकाटे व मोजमाप साधनांची वैधमापन शास्त्र विभागामार्फत तपासणी करणे, बनावट स्टिकर अथवा मुदतबाह्य प्रमाणपत्र असलेले वजनकाटे जप्त करणे, दोषींविरुद्ध वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करणे, ब्रह्मपुरी प्रकरणातील उपकरणांचा जिल्ह्यात वापर होत आहे का याची चौकशी करणे, ग्राहक जनजागृती मोहीम राबविणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करणे यांचा समावेश आहे.
ग्राहकांची फसवणूक हा केवळ आर्थिक गुन्हा नसून ग्राहकांच्या विश्वासावर घाला घालणारा गंभीर प्रकार असल्याने प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन जिल्हाभर व्यापक तपासणी मोहीम राबवावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे प्रांत सदस्य चंद्रकांत पतरंगे, मार्गदर्शक विजय कोतपल्लीवार, उपाध्यक्ष विजय साळवे, सचिव अरुण पोगळे, महिला जिल्हा प्रमुख सुचिता धकाते, आशाताई कोकोडे, बळवंत येवले आणि एम. डी. मेश्राम यांनी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














