सिनेस्टाईल पाठलागानंतर दारूतस्कर जेरबंद ; ४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त

35

सिनेस्टाईल पाठलागानंतर दारूतस्कर जेरबंद ; ४.५२ लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. ०६ : स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाचा सिनेस्टाईल पाठलाग करून आरोपीला अटक केली. या कारवाईत १ लाख ५२ हजार ८८० रुपयांची देशी दारू व ३ लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ४ लाख ५२ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कुरखेडा पोलिसांनी आंधळी-खैरी मार्गावर सापळा रचला होता. दरम्यान, आंधळीकडून खैरीच्या दिशेने येणारे सीजी-०४ एचसी-८९१८ क्रमांकाचे पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग करून खैरी पांदण रस्त्याजवळ अडविले.
वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणाऱ्या देशी दारूच्या २६ पेट्या आढळून आल्या. याप्रकरणी वाहन चालक अकालसिंग संगतसिंग पटवा (वय २७, रा. आंबेडकर वॉर्ड, देसाईगंज) याला अटक करण्यात आली.
ही कारवाई ठाणेदार महेंद्र वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे, पोलीस हवालदार शेखलाल मडावी आणि महिला पोलीस शिपाई अरुणा लोभांरे यांच्या पथकाने केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here