खांबाळ्यात स्वस्त धान्याचा ‘घोटाळा’ ? लाभार्थ्यांना कमी धान्य, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

4

खांबाळ्यात स्वस्त धान्याचा ‘घोटाळा’ ? लाभार्थ्यांना कमी धान्य, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०६ : धानोरा तालुक्यातील खांबाळा येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १ मधून मागील तीन महिन्यांपासून लाभार्थ्यांना शासनाने मंजूर केलेल्या प्रमाणापेक्षा कमी धान्य वितरित करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ४ जून रोजी तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, लाभार्थ्यांना प्रत्यक्षात कमी धान्य देण्यात येत असताना पावत्या व अधिकृत नोंदींमध्ये मात्र संपूर्ण धान्य वितरित केल्याचे दाखविण्यात येत आहे. याबाबत संबंधित दुकानदाराकडे विचारणा केली असता शासनाकडूनच कमी धान्य प्राप्त होत असल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र, पावत्यांवरील नोंदी आणि प्रत्यक्ष वितरणातील तफावत पाहता गावकऱ्यांनी संशय व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे अनेक गरीब व गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत असून आर्थिक अडचणींनाही सामोरे जावे लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच सर्व लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार संपूर्ण धान्य मिळण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर उपसरपंच दीपक कुंमरे, तंटामुक्त समिती अध्यक्ष पुंडलिक गावतुरे यांच्यासह मनोज मोहरले, परसराम वाडगुरे, लहानू बोरुले, नानाजी वाढई, बाबुराव मसराम, रवींद्र मोहुरले, विकास महुरले, रामदास नागोसे, पितांबर वाढई, दीपक दुगा, आबाजी सोनुले, वामन मामेडवार, सुमन मामेडवार, एकनाथ मेश्राम आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
खांबाळा येथील स्वस्त धान्य वितरणातील अनियमिततेमुळे परिसरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासन या प्रकरणात कोणती कारवाई करते, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #dhanoranews #localnews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here