मका खरेदीसाठी गोदाम उपलब्ध करून मुदतवाढ द्या
– आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०६ : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करण्यात आली असून शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत मका विक्रीसाठी अनेक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र मका खरेदी प्रक्रियेची अंतिम मुदत जवळ येऊन ठेपली असतानाही अनेक शेतकऱ्यांचा मका अद्याप खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शासनाने मका खरेदीसाठी अतिरिक्त गोदामांची व्यवस्था करून खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था कुरखेडाचे उपाध्यक्ष चांगदेव फाये यांनी केली आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हमीभावाचा लाभ मिळावा या उद्देशाने मका खरेदी केंद्रांवर नोंदणी केली. मात्र खरेदीचा वेग मंद असल्याने अनेक शेतकरी अजूनही आपल्या क्रमांकाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी मोठ्या प्रमाणावर मका साठवून ठेवावा लागत असून शेतकऱ्यांसमोर साठवणुकीची समस्या निर्माण झाली आहे.
मका खरेदीची सध्याची मुदत संपुष्टात आल्यास अनेक पात्र शेतकरी हमीभाव योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांना आपला मका कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ येऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता शासनाने तातडीने मका साठवणुकीसाठी आवश्यक गोदामे उपलब्ध करून द्यावीत तसेच खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देऊन सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांचा मका हमीभावाने खरेदी करावा, अशी मागणी चांगदेव फाये यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकरी बांधवांनी केली आहे.
तालुक्यातील एकाही पात्र शेतकऱ्याला हमीभावापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी संबंधित विभागाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














