कोरची पोलिसांनी अट्टल घरफोड्याच्या आवळल्या मुसक्या
– मोबाईलशिवाय फिरणारा चोरटा जेरबंद ; चोरीचे १५ हजार रुपये हस्तगत
The गडविश्व
कोरची, दि. ०५ : नवरगाव येथील घरफोडी प्रकरणातील अट्टल चोरट्याला कोरची पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेले १५ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आरोपी कोणताही मोबाईल फोन वापरत नसल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते.
३१ मे रोजी दानसाय काटेंगे यांच्या घरात शिरून कपाटातील रोख रक्कम चोरून नेण्यात आली होती. तक्रारीनंतर कोरची पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आरोपी अनिल ऊर्फ बिट मतकेर उईके याचा ठावठिकाणा मिळवत त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीची रक्कम जप्त करण्यात आली.
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी जिल्हा मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे करण्यात आली. ही कारवाई कोरची पोलिसांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली.














