राजोली रेती घाटावर नियमांची पायमल्ली ; कंत्राटदाराचा मनमानी कारभार उघड
– तहसीलदार ॲक्शन मोडमध्ये
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०५ : धानोरा तालुक्यातील राजोली रेती घाटावर शासनाच्या वाळू उत्खनन नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरस्थित प्रशांत कन्स्ट्रक्शन कंपनीला विविध सर्व्हे क्रमांकांमधून १८ हजार १०० ब्रास रेती उत्खनन व वाहतुकीची ९ जून २०२६ पर्यंत परवानगी देण्यात आली असली, तरी कंत्राटदाराने ताबा मिळताच नियमबाह्य पद्धतीने रेती उपसा सुरू केल्याची गंभीर तक्रार पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीला ६ मे २०२६ रोजी घाटाचा ताबा देण्यात आला होता. मात्र त्यानंतर रेती उत्खननासाठी निर्धारित अटी व शर्तींचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा आणि विनापरवाना वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
२७ मे रोजी करण्यात आलेल्या पाहणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. शासनाच्या वाळू निर्गती धोरणानुसार नदीपात्रात जास्तीत जास्त दीड मीटर खोलीपर्यंतच उत्खनन करता येते. मात्र राजोली घाटावर दोन मीटरपेक्षा अधिक खोल खड्डे करून रेतीचा उपसा करण्यात येत असल्याचे आढळले. याशिवाय उत्खनन केलेल्या जागेचा भूभाग बदलण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर केल्याचेही समोर आले आहे.
तसेच स्टॉक पॉईंटपर्यंत रेती वाहतूक करणाऱ्या बहुतांश वाहनांकडे वैध ट्रान्झिट पास (टीपी) नसल्याचे निरीक्षणात आढळले. अवघ्या दोन ट्रॅक्टरचा अपवाद वगळता इतर वाहनांकडे आवश्यक परवानगीपत्र नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे सकाळी ६ वाजण्यापूर्वीच उत्खनन सुरू होत असल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत धानोऱ्याचे तहसीलदार गणेश माळी यांनी २९ मे रोजी तातडीचे आदेश जारी केले आहेत. भूमी अभिलेख विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करून स्टॉक पॉईंटवरील वाळू साठ्याची प्रत्यक्ष मोजणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याशिवाय नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपविण्यात आली असून घाटावरील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली जाणार आहे. नदीपात्रात यंत्राच्या साहाय्याने अवैध उत्खनन झाल्याचे अथवा महाखनिज प्रणालीतील नोंदींमध्ये तफावत आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
राजोली रेती घाटावरील या कथित गैरप्रकारामुळे महसूल प्रशासन, खनिज विभाग आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews














