कुरखेड्यात १५ दिवस घंटागाड्या गायब ; संतप्त युवकांनी नगरपंचायतीच्या गेटवरच टाकला कचऱ्याचा ढीग

31

कुरखेड्यात १५ दिवस घंटागाड्या गायब ; संतप्त युवकांनी नगरपंचायतीच्या गेटवरच टाकला कचऱ्याचा ढीग
– लाखो रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०४ : कुरखेडा नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनातील निष्काळजीपणाविरोधात आज शहरातील युवक व नागरिकांचा संताप उफाळून आला. गेल्या तब्बल १५ दिवसांपासून शहरात कचरा संकलनासाठी घंटागाड्या फिरत नसल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी घराघरातील कचरा गोळा करून तो थेट नगरपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर टाकत अनोखे आंदोलन छेडले.
विशेष म्हणजे, ज्या प्रवेशद्वारावर ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘एक पाऊल स्वच्छतेकडे’ असे संदेश झळकत आहेत, त्याच ठिकाणी कचऱ्याचा ढीग साचल्याने नगरपंचायतीच्या स्वच्छता व्यवस्थेची पोलखोल झाल्याची चर्चा शहरभर रंगली.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मागील दोन आठवड्यांपासून शहरात कचरा उचलण्यासाठी एकही घंटागाडी आली नसल्याने घरांमध्ये कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस दखल न घेतल्याने युवकांनी ट्रॅक्टरमध्ये कचरा भरून तो नगरपंचायतीच्या गेटवर आणून टाकला.
दरम्यान आंदोलक युवक भावेश मुंगनकर यांनी सांगितले की, “आम्ही नियमित कर भरतो, मात्र मूलभूत स्वच्छता सुविधाच मिळत नाहीत. अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरपंचायतीचे डोळे उघडावेत म्हणून आम्हाला आंदोलन करावे लागले.”
घनकचरा व्यवस्थापनाचे कंत्राट आचारसंहितेमुळे रखडल्याचे कारण प्रशासनाकडून दिले जात असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मात्र, आचारसंहितेच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा अधिकार प्रशासनाला नाही, असा आरोपही युवकांनी केला.
दरम्यान, येत्या दोन ते तीन दिवसांत कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला नाही, तर शहरातील नाल्यांमध्ये साचलेले सांडपाणी आणि घाण पाणी थेट नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर आणून ओतण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे या आंदोलनानंतर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here