तुमरगुंडा फाट्यावर भीषण अपघात ; दुचाकीस्वार युवक ठार, एक गंभीर

18

तुमरगुंडा फाट्यावर भीषण अपघात ; दुचाकीस्वार युवक ठार, एक गंभीर
– भरधाव इनोव्हा-दुचाकीची समोरासमोर धडक; चालक ताब्यात, वाहन जप्त
The गडविश्व
एटापल्ली, दि. ०४ : तालुक्यातील आलदंडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील तुमरगुंडा फाट्याजवळ गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून परसलगोदी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परसलगोदी येथील अनिल हिचामी (वय २९) व बालाजी दुर्वा हे दुचाकीने आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, तुमरगुंडा फाट्याजवळ एटापल्लीच्या दिशेने येणाऱ्या भरधाव इनोव्हा क्रिस्टा वाहनाची त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर दोन्ही युवकांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे दाखल करण्यात आले. मात्र, गंभीर दुखापतीमुळे अनिल हिचामी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तर गंभीर जखमी झालेल्या बालाजी दुर्वा यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच आलदंडी पोलीस मदत केंद्राचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी इनोव्हा चालक सुनील सुभाष राठोड (रा. दुमलगुडा, ता. जिवती, जि. चंद्रपूर) याला ताब्यात घेतले असून अपघातग्रस्त इनोव्हा वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात जमा केले आहे.
या अपघातामुळे मृत अनिल हिचामी यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास आलदंडी पोलीस मदत केंद्र करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here