लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या तिरंदाजांनी जिंकले सुवर्ण व रौप्य पदक

11

लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या तिरंदाजांनी जिंकले सुवर्ण व रौप्य पदक
– राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत गडचिरोलीची सुवर्ण कामगिरी
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी ठरलेल्या कामगिरीत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए)च्या तिरंदाजांनी राष्ट्रीय स्तरावर चमकदार यश संपादन केले आहे. गोवा येथे आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धा-2026 मध्ये अकादमीच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदक पटकावत गडचिरोलीच्या नावाला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून दिला.
गोवा अमेच्युअर आर्चरी असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला आर्चरी असोसिएशन ऑफ इंडिया तसेच स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा यांची मान्यता होती. देशभरातील विविध राज्यांतील गुणवंत तिरंदाजांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेत लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीची खेळाडू दिया बॅनर्जी हिने अंडर-21 गटात उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. तिच्या या दमदार प्रदर्शनामुळे तिने आपल्या गटातील राष्ट्रीय विजेतेपदावरही नाव कोरले.
तर आदित्य नायगमकर याने अंडर-18 गटात उल्लेखनीय कौशल्य, एकाग्रता आणि जिद्दीचे प्रदर्शन करत रौप्य पदकावर कब्जा केला. देशभरातील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांशी चुरशीची लढत देत त्याने हे यश मिळविले.
या दोन्ही खेळाडूंचे यश त्यांच्या कठोर परिश्रमांचे, शिस्तबद्ध सरावाचे आणि लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीकडून मिळालेल्या दर्जेदार प्रशिक्षणाचे फलित मानले जात आहे. अकादमीकडून सातत्याने ग्रामीण व आदिवासी भागातील क्रीडा प्रतिभेला प्रोत्साहन दिले जात असून राष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्याचे कार्य केले जात आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील युवा खेळाडूंना प्रेरणा मिळून क्रीडा क्षेत्रात नवे यश संपादन करण्यासाठी नक्कीच बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here