देसाईगंज-लाखांदूर मार्गावर थरार : कार पलटून पेटली, चालक बचावला
The गडविश्व
ता. प्र/ देसाईगंज, दि. २९ : देसाईगंज-लाखांदूर मुख्य मार्गावरील चपराळ पहाडी परिसरात भरधाव चारचाकी वाहनाचे समोरील टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन पलटी झाले आणि काही क्षणातच पेट घेतल्याने संपूर्ण कार आगीत जळून खाक झाल्याची थरारक घटना शुक्रवारी (दि. २९ मे) दुपारच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात चालक मंगेश राऊत (वय ३३, रा. देसाईगंज) हे नशीब बलवत्तर असल्याने बालबाल बचावले असून त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश राऊत हे मारुती सुझुकी अल्टो कारने लाखांदूरच्या दिशेने जात असताना वाहनाचे समोरील टायर अचानक फुटले. त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार मुख्य मार्गावर पलटी झाली. अपघातानंतर काही क्षणातच वाहनाने पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग वेगाने पसरल्याने संपूर्ण कार ज्वाळांच्या भक्ष्यस्थानी पडली.
घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच नगरपंचायत लाखांदूर येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, तोपर्यंत वाहन पूर्णतः जळून खाक झाले होते.
या घटनेमुळे काही काळ देसाईगंज-लाखांदूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सदर अपघातात वाहन मालकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews














