‘पुजाऱ्यांकडे नव्हे, आरोग्य केंद्रात या’ : मुतनूरमध्ये हिवताप जनजागृती अभियान
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाबाबत समाजात असलेल्या अंधश्रद्धा दूर करून नागरिकांनी वेळेवर तपासणी व उपचार घ्यावेत, या उद्देशाने मुतनूर गावात विशेष हिवताप जनजागृती व समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “आजाराची लक्षणे दिसताच पुजाऱ्यांकडे न जाता तात्काळ आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करा”, असा महत्त्वपूर्ण संदेश यावेळी नागरिकांना देण्यात आला.
जिल्हा व्हीबीडी सल्लागार राजेश आर. कार्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात गावातील पुजारी व आशा स्वयंसेविकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद गेडाम, डॉ. राहुल गेडाम, औषध निर्माण अधिकारी वसंत कन्नाके, पावी मुरांडा, उपसरपंच विनोद कोंडामी, गावातील पुजारी कानू नरोटे, सुरेश पदा, गाव भैय्या पाटील सुरेश नरोटे, गाव पाटील अनिल नरोटे, आशा स्वयंसेविका सौ. गीता आतला, सामाजिक कार्यकर्त्या गीतापदा, आरोग्य सेविका शांती मंडल यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित नागरिकांना हिवताप प्रतिबंधासाठी मच्छरदाणीचा नियमित वापर, डास नियंत्रणासाठी फवारणी, वेळेवर तपासणी, तात्काळ निदान आणि योग्य औषधोपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. हिवतापासंदर्भात समाजात पसरलेल्या गैरसमजुती व अंधश्रद्धा दूर करून नागरिकांनी आरोग्य यंत्रणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले.
हिवतापाचे लक्षण दिसून आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करणे व निदान स्पष्ट झाल्यास तातडीने उपचार घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जनसहभाग आणि जनजागृतीच्या माध्यमातून हिवतापमुक्त समाज निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.














