बामणीत गडचिरोली पोलिसांचे आरोग्य शिबिर ; 170 नागरिकांची तपासणी

20

बामणीत गडचिरोली पोलिसांचे आरोग्य शिबिर ; 170 नागरिकांची तपासणी
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली पोलीस दलाच्या सामाजिक बांधिलकीतून दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल आणि शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपपोस्टे बामणी येथे शुक्रवारी (दि. 22 मे) मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 170 नागरिकांची तज्ज्ञ वैद्यकीय पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.
अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचविणे, आरोग्यविषयक जनजागृती करणे तसेच आवश्यक उपचार उपलब्ध करून देणे, या उद्देशाने पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर येथील डॉ. भाऊराव नाखले (मेडिसीन प्राध्यापक), डॉ. रितिक राज दास, डॉ. रुद्रप्रसाद कोरवी (कम्युनिटी मेडिसीन) आणि मेडिकल वर्कर राहुल कुमरे यांच्या पथकाने नागरिकांची तपासणी करून विविध आजार, पोषण समस्या आणि आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन केले.
शिबिरादरम्यान विविध आजारांची तपासणी करून आवश्यकतेनुसार नागरिकांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. तसेच अधिक उपचार आवश्यक असलेल्या 18 नागरिकांना पुढील उपचारासाठी शालिनीताई मेघे रुग्णालय, नागपूर येथे पाठविण्यात आले.
गडचिरोली पोलीस दलाने सन 2021 पासून आजपर्यंत 200 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून 42 हजार 500 हून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केली आहे. तसेच 5 रक्तदान शिबिरांतून 4 हजार 361 युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. ‘ऑपरेशन रोशनी’ अंतर्गत 9 हजार 971 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली असून 1 हजार 412 नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सदर उपक्रम पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. उपपोस्टे बामणीचे सपोनि. प्रमोद कुरसुंगे, पोउपनि. आलोक ठाकुर आणि पोलीस अंमलदार यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here