लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग 2026 ची दिमाखदार सांगता ; BCCC आलदंडी विजेता
– थरारक अंतिम सामन्यात टोडसा ट्रॉफी फायटर्सचा 3 धावांनी पराभव
The गडविश्व
गडचिरोली, २० : हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स ग्राउंडवर आयोजित करण्यात आलेल्या लॉयड्स व्हिलेज प्रीमियर लीग (LVPL) 2026 स्पर्धेची उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखदार पद्धतीने सांगता झाली. ग्रामीण भागातील युवा क्रिकेटपटूंना संधी उपलब्ध करून देत क्रीडा क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण करणाऱ्या या स्पर्धेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
5 मे रोजी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडला होता, तर 7 मेपासून अधिकृत सामन्यांना सुरुवात झाली होती. तब्बल अनेक दिवस रंगलेल्या क्रिकेटच्या रोमांचकारी लढतीनंतर 15 मे रोजी झालेल्या अंतिम सामन्यात BCCC आलदंडी संघाने टोडसा ट्रॉफी फायटर्स संघाचा अवघ्या 3 धावांनी पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले.
विजेत्या BCCC आलदंडी संघाला ट्रॉफीसह 75 हजारांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. उपविजेत्या टोडसा ट्रॉफी फायटर्स संघाला 50 हजार, तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या हेडरी हरिकेन्स संघाला 30 हजार, तर चौथ्या क्रमांकावरील नेंदर इलेव्हन हिरोज संघाला 20 हजारांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेल्या संघांनाही प्रत्येकी 10 हजारांचे प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे हेडरी हरिकेन्सचे प्रसंजीत सरकार यांना “मॅन ऑफ द सिरीज” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना 10 हजारांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट युवा खेळाडू आणि सामनावीर अशा विविध वैयक्तिक पुरस्कारांचे वितरणही करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी आयोजन समिती, लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी आणि सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील युवकांना दर्जेदार क्रीडा व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांची प्रतिभा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी योगदान देणारे पोलीस अधिकारी, स्वयंसेवक, CSR टीम सदस्य, लॉयड्सचे कर्मचारी, ग्रामस्थ आणि विविध विभागातील सहकाऱ्यांचे आयोजकांनी विशेष आभार मानले. ग्रामीण क्रीडा क्षेत्राला चालना देणारा आणि स्थानिक खेळाडूंना नवी दिशा देणारा हा क्रीडा महोत्सव ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.













