कुरखेड्यात डिझेलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा ; तुटवड्यामुळे नागरिक हैराण
The गडविश्व
ता. प्र/कुरखेडा, दि. १९ : कुरखेडा शहरातील पेट्रोल पंपांवर गेल्या दोन-तीन दिवसांपासून डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. डिझेल भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मुख्य मार्गांवरील वाहतुकीवरही परिणाम होत असून, शहरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिझेल संपण्याच्या भीतीने शेतकरी, ट्रॅव्हल्स चालक, मालवाहू ट्रक चालक तसेच अन्य वाहनधारकांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केली. सकाळपासून सुरू झालेली ही गर्दी दुपारपर्यंत अधिक वाढत गेली. अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा पंपाच्या आवाराबाहेर रस्त्यापर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसून आले.
सध्या शेतीकामांचा हंगाम सुरू असून ट्रॅक्टर, पंपसंच आणि अन्य शेती यंत्रांसाठी डिझेलची मोठ्या प्रमाणात गरज आहे. अशा परिस्थितीत डिझेल टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. वेळेवर डिझेल उपलब्ध न झाल्यास शेतीची कामे रखडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे, मालवाहू वाहने तासनतास रांगेत उभी राहत असल्याने मालाची वेळेत वाहतूक करणे कठीण बनले आहे. याचा फटका व्यापारी आणि वाहतूक व्यावसायिकांनाही बसत आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून पेट्रोल पंपांवरील डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.














