गडचिरोली : विमानतळ-एमआयडीसीला शेतकऱ्यांचा विरोध, शेतजमिनींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि. १९ : गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी तसेच विविध प्रकल्पांसाठी सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींविरोधात १८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शेतकऱ्यांनी मोर्चा काढत जोरदार धरणे आंदोलन केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात शेतकरी, महिला, युवक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गडचिरोली तालुक्यातील गुरुवडा, हिरापूर, शिरपूर, राखी, चांदाळा, जांभळी आदी गावांमध्ये प्रस्तावित विमानतळासाठी प्रशासनाकडून प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवूनही हे सर्वेक्षण करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तर दुसरीकडे चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी १४ गावांतील शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या हालचालींनाही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शेतकऱ्यांच्या बैठकीत “कुणाचीही जमीन जबरदस्तीने घेणार नाही,” असे आश्वासन दिले होते. मात्र, संबंधित गावांतील जमिनींच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. प्रशासनाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय व्यवहार करता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. “माती ही आमची माय असून, तिच्या रक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढा देऊ,” असा निर्धार आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सरकारला इशारा देत, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेतला नाही, तर ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल,” असे सांगितले.
तर गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी, “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. शेतकऱ्यांची भूमिका हीच आमची भूमिका आहे,” असे स्पष्ट केले.
या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच-उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते तसेच हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते.














