पुसावंडीजवळ भीषण अपघात ; दुचाकीवरील नियंत्रण सुटून तरुणाचा जागीच मृत्यू

32

पुसावंडीजवळ भीषण अपघात ; दुचाकीवरील नियंत्रण सुटून तरुणाचा जागीच मृत्यू
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. १६ : धानोरा-रांगी मार्गावरील पुसावंडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १४ मे रोजी सायंकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृत तरुणाचे नाव संतोष नरेश शर्मा (वय ४३, रा. शेगाव, हल्ली मुक्काम धानोरा) असे आहे. संतोष शर्मा यांनी नुकतेच मोहली येथे ज्वेलर्सचे दुकान सुरू केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शर्मा हे आपल्या लहान भावाच्या मुलाचा वाढदिवस साजरा करून दुचाकी क्रमांक MH-34-CU-2941 ने मोहलीकडे जात होते. दरम्यान, पुसावंडी गावाजवळील एका वळणावर छोट्या पुलानजीक रस्त्यातील खड्ड्यात दुचाकी गेल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांच्या डोक्याला पुलाच्या भिंतीचा जोरदार मार लागला.
अपघात इतका भीषण होता की संतोष शर्मा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण रुग्णालयाच्या अॅम्बुलन्सने त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली.
या घटनेचा पुढील तपास धानोरा पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here