कुरखेडा-सती नदी पुलाला भेगा; महामार्गाच्या निकृष्ट कामावर ‘आप’ आक्रमक

109

कुरखेडा-सती नदी पुलाला भेगा; महामार्गाच्या निकृष्ट कामावर ‘आप’ आक्रमक
– कंत्राटदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी ; आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा , दि. ०७ : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३-सीच्या बांधकामावरून आता मोठा वाद निर्माण झाला असून, सती नदीवरील नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाला पडलेल्या भेगांमुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी आम आदमी पार्टीने आक्रमक भूमिका घेत संबंधित कंत्राटदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
मागील दोन वर्षांपासून महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून, नागरिकांना धूळ, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. त्यातच सती नदीवरील पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याला मोठ्या भेगा पडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पुलाची ही अवस्था भविष्यात मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारी असल्याची टीका होत आहे.
निकृष्ट साहित्याचा वापर व तांत्रिक त्रुटींमुळे पुलाच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. पुलाच्या बांधकामात वापरण्यात आलेल्या सिमेंट, लोखंड आणि रेतीची स्वतंत्र प्रयोगशाळेत तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या संदर्भात आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. महामार्ग व पुलाच्या कामाची सखोल तांत्रिक चौकशी करावी, संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराला तातडीने काळ्या यादीत टाकावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी, सचिव अमृत मेहेर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला आहे.
“दोन वर्षांपासून नागरिक त्रास सहन करत आहेत आणि जे काम झाले आहे तेही निकृष्ट दर्जाचे आहे. सती नदीवरील पुलाला पडलेल्या भेगा ही भविष्यातील मोठ्या दुर्घटनेची नांदी आहे. या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे,” असा आरोप आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष नसीर हाशमी यांनी केला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #kurkhedanews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here