शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : महाडीबीटीवर बियाणे व पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज सुरू
– दर्जेदार बियाणे व आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान तसेच राष्ट्रीय खाद्य तेल अभियान-तेलबिया अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिक योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवरून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य, गळीतधान्य, तृणधान्य, भरडधान्य व कडधान्य पिकांच्या उत्पादनवाढीसाठी सुधारित वाणांचे दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पीक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करून शेतकऱ्यांना प्रगत शेती पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
खरीप हंगाम २०२६-२७ साठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्रीमती प्रिती म. हिरळकर यांनी केले आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर स्वतः ऑनलाईन अर्ज करावा किंवा जवळच्या सेतू केंद्र, सीएससी केंद्र, सहाय्यक कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावा. अर्ज करताना फार्मर आयडी, आधार क्रमांक, सातबारा उतारा, बँक खाते तपशील तसेच आवश्यक कागदपत्रे जवळ ठेवावीत, असेही सांगण्यात आले आहे.
योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी जिल्ह्यातील कृषि अधिकारी, कर्मचारी व विस्तार यंत्रणेमार्फत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.













