कुरखेडा : रेतीअभावी घरकुलांची कामे ठप्प, बंद रेती घाटांमुळे लाभार्थी संकटात

76

कुरखेडा : रेतीअभावी घरकुलांची कामे ठप्प, बंद रेती घाटांमुळे लाभार्थी संकटात
– घाट तातडीने सुरू करण्याची नागरिकांची मागणी
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०७ : तालुक्यातील रेती घाट दीर्घकाळापासून बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह घरकुल लाभार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. रेतीअभावी मंजूर घरकुलांची बांधकामे ठप्प पडली असून, शासनाने तातडीने रेती घाट सुरू करून नागरिकांना सवलतीच्या दरात रेती उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शासनाच्या नियमानुसार घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत मिळणे अपेक्षित आहे. मात्र, रेती घाट बंद असल्याने ही योजना प्रत्यक्षात राबविली जात नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. परिणामी अनेक घरकुलांची कामे अर्धवट अवस्थेत असून लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
स्थानिक स्तरावर रेती उपलब्ध नसल्याने नागरिकांना बाहेरील भागातून चढ्या दराने रेती खरेदी करावी लागत आहे. सर्वसामान्य कुटुंबांसाठी हा खर्च परवडणारा नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच रेती घाट बंद असल्यामुळे शासनाचा महसूल बुडत असून स्थानिक मजुरांवरही बेरोजगारीची वेळ आली आहे.
या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कुरखेडा येथील नागरिकांनी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी, गडचिरोली यांना निवेदन सादर केले. बंद रेती घाट तातडीने सुरू करावेत, घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत रेती उपलब्ध करून द्यावी तसेच सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये प्रति ब्रास दराने रेती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या वेळी रामेश्वर मुंगमोडे, मयूर बोनावार, गणेश मेश्राम यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here