कुरखेडा : महामार्ग रस्ता व सती नदी पुलासाठी गडकरींकडे धाव

174

कुरखेडा : महामार्ग रस्ता व सती नदी पुलासाठी गडकरींकडे धाव
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. ०२ : कुरखेडा शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील सिमेंट रस्ता आणि सती नदीवरील मोठ्या पुलाचे काम गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. रखडलेल्या कामामुळे शहरवासीयांसह तालुक्यातील हजारो नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कुरखेडा शहरातील महामार्ग सिमेंट रस्ता व सती नदी पुलाचे रखडलेले काम तातडीने गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त संचालक श्रीकांत नागीलवार, भाजप तालुका महामंत्री प्रा. विनोद नागपूरकर, गुलाब मस्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सती नदीवरील पुलाचे काम अपूर्ण असल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर तात्पुरते रस्ते वारंवार वाहून जातात. परिणामी नागरिकांना अनेक किलोमीटरचा वळसा घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे वेळ, इंधन आणि श्रम यांचा मोठा अपव्यय होत असून नागरिकांत संताप वाढत आहे.
चांगदेव फाये यांनी सांगितले की, वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. येत्या दोन महिन्यांत पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होणे अत्यावश्यक आहे. अन्यथा नागरिकांना पुन्हा मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.
नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्ता व पुलाच्या कामांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here